मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे. मराठीतील अनेक ग्लॅमरस सुपरस्टार, चित्रपटातील भन्नाट लोकेशन, आणि हटके कथा या त्रिवेणी संगमामुळे सध्या चर्चेत असलेला ‘व्हिडीओ पॅलेस’ व ‘मेकब्रॅंड’ प्रस्तुत वन वे तिकीट हा सिनेमा २३ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतं आहे. युवा निर्मात्या कोमल उनावणे यांनी वन वे तिकीट चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे.
वन वे तिकीट या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. एका रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. हा रहस्यभेद कशाप्रकारे उलगडला जातो याची रंजक कथा वन वे तिकीट सिनेमातून दिग्दर्शक कमल नथानी व अमोल शेटगे यांनी मांडली आहे. हा चित्रपट म्हणजे एक प्रवास आहे, काही एकत्र येणाऱ्या गोष्टीचा, नियतींचा…एक थरारक, रोमांचक प्रवास. या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण इटली, फ्रान्स, स्पेन या नयनरम्य ठिकाणी झाले असून क्रुझवर चित्रित केला गेलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील तरुणाईला रिफ्रेश करणारं झालंय. ‘बेफिकर’ आणि ‘रेश्मी रेश्मी’ या दोन गीतांना चांगल्या हिट्स मिळाल्या आहेत. अश्विनी शेंडे, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकरलेल्या यातील गीतांना गौरव डगांवकार यांनी संगीतबद्ध केलं आहे. पार्श्वसंगीत ट्रॅाय आरीफ यांचं आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. आनंदी जोशी, सावनी रवींद्र, रोहित राऊत, श्रीनिधी घटाटे, गौरव डगांवकर, क्षितीज वाघ, अरुणिमा भट्टाचार्य, शीफा हरीस यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.
सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, नेहा महाजन, आशा शेलार, रॉजर डेकॉस्टा या कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला वन वे तिकीट प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते ‘क्लिक फ्लिक फिल्म्स’ व सुरेश पै आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा-सवांद अमोल शेटगे यांचे असून सहदिग्दर्शन अमोल पावस्कर यांचं आहे. रुपंग आचार्य यांनी छायांकनाची तर स्वप्नील टकले यांनी कलादिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संकलन आशिष म्हात्रे व अपूर्वा याचं आहे. नृत्यदिग्दर्शन राजीव व सुजीत कुमार याचं आहे. वन वे तिकीट २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा