आपल्या अस्खलित विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे बोललं जातं आहे. गेल्या बुधवारी (१० ऑगस्ट) राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करण्याचं बंद केल्याची माहिती त्यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरासह विदेशातून प्रार्थना केली जात आहे. नुकतंच राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी यांची त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत पिंकविलाशी बोलताना एहसान कुरेशी म्हणाले, “राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अजूनही हार मानलेली नाही. ते त्यांना वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. पण आता केवळ एखादा मोठा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. तसेच त्यांच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी आहे. त्यांच्या मेंदूने काम करणं बंद केलं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी आम्ही सर्व मित्र प्रार्थना करत आहोत. काही वेळेपूर्वी आम्ही हनुमान चालिसाचा जपसुद्धा केला आहे.”
राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबद्दल पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “प्रार्थना करा…”
“राजूची मुलगी अंतरा हिचे लवकरच लग्न होणार आहे. त्यांचा मुलगा वयाने खूपच लहान आहे. आम्ही त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. ज्या माणसाने जगाला हसवले, आता संपूर्ण जग त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. आम्ही सर्व संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचू. राजू भाई बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे.” असेही एहसान कुरेशी यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं होतं?
राजू श्रीवास्तव हे बुधवारी १० ऑगस्टला व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालवत गेली. मात्र यादरम्यान ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वृत्त समोर आलं होतं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.