बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ने देशात तब्बल ३०० कोटींचा गल्ला जमवला असला तरी देशातील एकूण लोकसंख्येच्या केवळ दोन टक्के भारतीयांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याची धक्कादायक आकडेवारी चित्रपटगृहांच्या साखळीने जाहीर केली आहे.

गेल्या महिन्यात ‘बजरंगी भाईजान’चा टेलिव्हिजन प्रिमिअर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील ७४.५ दशलक्ष लोकांनी बजरंगी भाईजान टेलिव्हिजनवर पाहिला तर, ‘ब्लॉकब्लस्टर हिट’ ठरलेला हा चित्रपट केवळ ३ कोटी २१ लाख लोकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याचे समोर आले आहे.

एकूण लोकसंख्येच्या केवळ २ टक्के लोकांनी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटगृहात पाहिला असूनही चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. जर हीच आकडेवारी पाच टक्क्यापर्यंत घेऊन जाण्यास यश आले तर भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा फायदा होईल, असे कार्निव्हल सिनेमाचे सीईओ आणि दिग्दर्शक पी.व्ही सुनील यांनी सांगितले.

देशातील चित्रपटगृहांची संख्या वाढविण्याची गरज देखील त्यांनी व्यक्त केली. भारतात प्रत्येकी दहा लाख लोकांच्या मागे सात चित्रपटगृह आहेत तर, हीच आकडेवारी अमेरिकेत १०० चित्रपटगृहांपर्यंत आहे. देशात एकूण चित्रपटगृहांच्या संख्येपैकी १५ टक्के हे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आहेत; उर्वरित सर्व सिंगल स्क्रिन चित्रपटगृह आहेत. त्यामुळे जगभरात सर्वाधिक चित्रपट निर्मितीचा देश म्हणून जरी भारताची ओळख असली तरी त्याचे उत्पन्नात अपेक्षित रुपांतर होत नाही. कारण, आजही बहुसंख्य लोक चित्रपटगृहांपासून वंचित आहेत, असेही पी.व्ही.सुनील म्हणाले.

Story img Loader