सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. करोना नंतर दोन वर्षांनी यंदा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे. त्यानंतर आता विल स्मिथचा माफी मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विल स्मिथनं ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो मंचावर गेला तेव्हा डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. पुरस्कार स्वीकारताना विल स्मिथ खूपच भावुक झाला होता. त्यावेळी त्यानं माफी देखील मागितली. तो म्हणाला, ‘रिचर्ड विलियम्स यांनी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मी आज खूप खुश आहे. देव माझ्याकडून काय करून घेऊ इच्छितो आण मी काय करतोय हे जाणून घेल्यानंतर मला आनंद झाला आहे.’
विल स्मिथ पुढे म्हणाला, ‘मी आज अकादमीची माफी मागू इच्छितो. माझ्यासोबत ज्यांना नामांकन मिळालं आहे त्या सर्वांनी मला माफ करा. हा एक सुंदर क्षण आहे आणि मी जिंकलोय म्हणून माझ्या डोळ्यात हे अश्रू नाहीयेत. मी आज एक ध्येय वेड्या बापाप्रमाणे दिसतोय. विलियम्स रिचर्ड यांच्यासारखा. शेवटी प्रेमात माणूस वेड्यासारखं वागतोच. धन्यवाद आणि आशा करतो की अकादमी मला पुन्हा या मंचावर आमंत्रित करेल.’
विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची कथा टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांच्या कथेवर आधारित आहे. मात्र, कनशिलात लगावल्याच्या व्हिडीओमुळे विल स्मिथ चर्चेत आहे.