जगभरात सर्वाच प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार २०२३ ची सुरुवात झाली आहे. या वर्षीचे नॉमिनेशन लॉक झाले आहेत आणि आता सर्वांना १२ मार्चला होणाऱ्या अवॉर्ड नाइटची उत्सुकता आहे. पण मागच्या वर्षी घडलेल्या एका घटनेवरून आता ऑस्करच्या टीमने मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी अभिनेता विल स्मिथने कॉमेडियन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली होती. त्यामुळे यंदा असं काही घडू नये यासाठी अकादमीने महत्त्वाचा निर्णय घेत एक टीम यासाठी नेमली आहे.
मागच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा क्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील वादाने गाजवला. स्मिथने सर्वांसमोर क्रिसच्या कानशिलात लगावली होती. ही घटना त्यावेळी खूपच चर्चेत राहिली होती. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. पण आता २०२३ च्या अशाप्रकारची कोणतीही घटना घडू नये यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून यासाठी नवी क्रायसेस टीम नेमण्यात आली आहे. २०२२ च्या विल स्मिथ प्रकरणानंतर या टीमची नेमणूक करण्यात आली आहे.
आणखी वाचा- विल स्मिथवर ऑस्कर अकादमीकडून १० वर्षांची बंदी, अभिनेता म्हणतो “त्यांचा हा निर्णय…”
येत्या १२ मार्चला होणाऱ्या पुरस्कार सोहळा यावेळी कॉमेडियन जिमी किमेल होस्ट करणार आहे. मागच्या वर्षीच्या विल स्मिथ प्रकरणाबद्दल अकादमी प्रेसिडंट जेनेट यांग यांचं म्हणणं आहे की मागच्या वर्षी यावर जी कारवाई करण्यात आली ती पुरेशी नव्हती. याशिवाय अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे सीईओ बिल क्रेमर म्हणाले, “मागच्या वर्षी जी घटना घडली त्यानंतर अशा सर्व गोष्टींवर विचार करण्यात आला ज्या या पुरस्कार सोहळ्यदरम्यान घडू शकतात. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने काही प्लान तयार केले आहेत. जे या सोहळ्या होणाऱ्या घटना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून अशी कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने कारवाई करणं सोपं जाईल.”
मागच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कॉमेडियन आणि होस्ट क्रिस रॉक स्टेजवर होता आणि त्याने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरून खिल्ली उडवली होती. या मस्करीनंतर भडकलेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन कॉमेडियनच्या कानशीलात लगावली होती. या घटनेनंतर विल स्मिथ पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहिला. त्याला ‘किंग रिचर्ड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. मात्र यानंतर त्याने अकादमीमधून राजीनामा दिला आणि अकादमीने त्याच्यावर १० वर्षांसाठी बंदी घातली आहे.