काही कारणास्तव चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर झालेल्या नायकाला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी कराव्या लागलेल्या धडपडीची कथा रंगवलेल्या ‘बर्डमॅन’ने यंदाच्या ऑस्करवारीत दणदणीत यश मिळवत तब्बल तीन पुरस्कार प्राप्त केले. सवरेत्कृष्ट चित्रपटाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन व मूळ पटकथा या तीन श्रेणींसाठी ‘बर्डमॅन’ने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यावर छाप पाडली. सवरेत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मात्र स्टीफन हॉकिंग यांची व्यक्तिरेखा रंगवणारा ब्रिटिश अभिनेता एडी रेडमायन याला प्राप्त झाला.
   विदेशी चित्रपटांच्या श्रेणीत ‘इदा’ या पोलिश चित्रपटाला ऑस्करचे भाग्य प्राप्त झाले. भारताच्या वाटय़ाला पुन्हा एकदा अपयश आले. भारताकडून ‘लिअर्स डाइस’ या चित्रपटाची शिफारस करण्यात आली होती.
यंदाचा ८७वा ऑस्कर पुरस्कार सोहळा येथे सोमवारी नेहमीच्याच परंपरेत साजरा झाला. अ‍ॅलेजांड्रो इनारिटू यांच्या ‘बर्डमॅन’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपट व उत्कृष्ट दिग्दर्शक व मूळ पटकथा हे पुरस्कार मिळाले, तर रिचर्ड लिंकलेटर यांच्या ‘बॉयहूड’ या चित्रपटास त्याने मागे टाकले. यंदा अटीतटीच्या लढतीत ‘बर्डमॅन’ने बाजी मारली, उत्कृष्ट छायालेखनाचा पुरस्कारही या चित्रपटानेच पटकावला आहे.
‘बर्डमॅन’ला एकूण नऊ नामांकने होती. वेस अँडरसन यांचा ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ हा चित्रपटही तोडीचाच होता; पण त्याला मूळ सुरावट वा गाणे, केशभूषा, उत्कृष्ट निर्मिती व वेशभूषा, मेकअप यासाठीचे पुरस्कार मिळाले आहेत.
ब्रिटिश अभिनेता एडी रेडमायन याने ‘बर्डमॅन’ची घोडदौड रोखताना, ख्यातनाम विश्वरचना वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. ‘द थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. ‘बर्डमॅन’चा अभिनेता मायकेल कीटन याने त्याला अटीतटीची लढत दिली, इतर नामांकनांत बेनेडिक्ट कमबरबॅच, ब्रॅडले कूपर व स्टीव्ह कॅरेल यांचा समावेश होता.
ऑस्कर पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणेः

सर्वोत्कृष्ट चित्रपट- बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट अभिनेता- एडी रेडमेन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ज्युलियन मूर (स्टिल अॅलिस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अॅलेजॅन्ड्रो गोन्झालीज इनारिटू (बर्डमॅन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पॅट्रिशिया अरक्वेट (बॉयहूड)
परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट – इडा (पोलंड)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म – क्राईसिस हॉटलाईन
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द फोन कॉल
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मिलेना कॅनोनेरो (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग – ऍलन रॉबर्ट मुरे आणि बुब अस्मान (अमेरिकन स्नायपर)
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग – क्रेग मन, बेन विलकिन्स, आणि थॉमस कर्ले (व्हिपलॅश)
 सर्वोत्कृष्ट अनिमेटेड शॉर्ट फिल्म- फिस्ट
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल्स – इंटरस्टेलर
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – ऍडम स्टॉकहाऊसेन व ऍना पिनॉक (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी-  इमॅन्युएल लुबेझ्की (बर्डमॅन)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- टॉम क्रॉस (व्हिपलॅश)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर- सिटीझनफोर
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग- ग्लोरी (सेल्मा)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर – अॅलेक्झांडर डेस्पलाट (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले – द इमिटेशन गेम (ग्रॅहम मूर)

अल्झायमर या रोगावर आमच्या ‘अलाइस’ चित्रपटातून एक प्रकाशकिरण टाकला आहे. आज या रोगाने अनेक लोक पीडित आहेत. त्या रोगावर प्रभावी उपचार सापडायला हवेत. – ज्युलियान मूर

आपण करदाते, नागरिक, समान
वेतन यांसाठी लढलो; पण आता अमेरिकेत महिलांच्या समान हक्कांसाठी लढण्याची वेळ आली आहे. – पॅट्रिशिया अ‍ॅरक्वेट

आपण नशीबवान पुरुष
आहोत. एएलएस झालेल्या लोकांना ही श्रद्धांजली आहे व हॉकिंग कुटुंब तर वेगळेच आहे, जणू आपण त्यांचे परिरक्षक आहोत. – रेडमायन

Story img Loader