वर्षांनुवर्षे भारतीयांना भुरळ घालणारा कृष्ण आणि बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राहायला जागा शिल्लक नसल्यामुळे थेट पंतप्रधानांची भेट घेणारे प्राणी आता सगळ्या जगाला आपली करामत दाखवायला सिद्ध झाले असून पुण्यामध्ये तयार झालेल्या ‘कृष्ण और कंस’, ‘दिल्ली सफारी’ या दोन अ‍ॅनिमेशनपटांची ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी जगातील सर्वोत्तम एकवीस सिनेमांमध्ये निवड झाली आहे.
निवडल्या गेलेल्या एकवीस अ‍ॅनिमेशनपटांमधून ऑस्करसाठीची अंतिम नामांकने जाहीर करण्यात येणार आहेत. ‘कृष्ण और कंस’ या अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती बिग अ‍ॅनिमेशन स्टुडिओने केली असून दिग्दर्शन विक्रम व्हेटुरी यांनी केले आहे. कृष्ण आणि कंसाची गोष्ट या अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. दिल्ली सफारी या अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती क्रेयॉन स्टुडिओने केली आहे. राहायला जागाच शिल्लक न राहिल्यामुळे बोरीवली नॅशनल पार्कमधले प्राणी थेट पंतप्रधानांची भेट घेतात. या प्राण्यांच्या दिल्लीपर्यंतच्या प्रवासाची गोष्ट या अ‍ॅनिमेशनपटामध्ये मांडण्यात आली आहे.
‘‘गोष्ट सांगणे हे भारतीयांच्या रक्तातच आहे. मात्र सगळ्यांना भावेल अशी गोष्ट चिरकालीन ठरते. अशी आपल्या संस्कृतीतील, सर्व वयोगटांना भावणारी गोष्ट मांडण्याच्या दृष्टीने ‘कृष्ण और कंस’ या अ‍ॅनिमेशनपटाची निर्मिती केली. यासाठी पाच वर्षे काम सुरू होते. यामध्ये आम्ही कथानकावरच अधिक भर दिला आहे. भारतात अ‍ॅनिमेशन पट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल कमी आहे. अ‍ॅनिमेशनकडे लहान मुलांचे साहित्य म्हणूनच अजून पाहिले जाते. ऑस्करसाठी झालेली निवड ही मानसिकता बदलण्यामध्ये मदत करेल, अशी आशा आहे,’’ अशा भावना या अ‍ॅनिमेशनपटाचे निर्माते आशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. दिल्ली सफारीचे निर्माते निषाद टाकिया म्हणाले, ‘‘भारतात या वर्षी पाच अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाले, त्यापैकी दोन अ‍ॅनिमेशनपटांना ऑस्करसाठी जाण्याची संधी मिळणे ही गोष्ट भारतीय कलाकारांमधील प्रतिभा सिद्ध करणारी गोष्ट आहे. जगाला भावेल, जगातल्या सर्व ठिकाणचा विषय मांडण्याच्या दृष्टीने दिल्ली सफारीचे कथानक रचण्यात आले आहे.’’
या दोन्ही अ‍ॅनिमेशनपटांना सृजन अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग इन्स्टिटय़ूटच्या वतीने बुधवारी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, सृजन अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग इन्स्टिटय़ूटचे संचालक संतोष रासकर उपस्थित होते. ‘‘तुमच्या स्वप्नातली, कल्पनेतील दुनिया उभी करण्याची शक्ती फक्त अ‍ॅनिमेशनपटांमध्ये आहे, ती शक्ती अगदी चित्रपटांमध्येही नाही. अ‍ॅनिमेशनला भारतात अजून प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे,’’ असे मत सुनील सुकथनकर यांनी यावेळी व्यक्त केले.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा