‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्रीमध्ये काम करणाऱ्या बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याने दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या एका मुलाखतीत या जोडप्याने चित्रपट निर्मात्यांवर आर्थिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याने म्हटलंय की डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगदरम्यान कार्तिकी गोन्साल्विस त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत होती. मात्र, या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर तिचं वागणं एकदम बदललं. ऑस्कर मिळाल्यानंतर कार्तिकी अंतर राखून वागू लागली, असा दावा त्यांनी केला.
या जोडप्याने मुलाखतीत लग्नाच्या सीनच्या शुटिंगसाठी केलेल्या खर्चाचा उल्लेख केला. बेलीने आरोप केला आहे की तिच्या नातवाच्या शिक्षणासाठी वाचवलेले पैसे तिला लग्नाच्या सीनसाठी खर्च करावे लागले. “कार्तिकीने सांगितलं की, तिला लग्नाचा सीन एका दिवसात शूट करायचा आहे. मात्र, तिच्याकडे त्यासाठी पैसे नसल्याने आम्हाला व्यवस्था करण्यास सांगितलं. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. कार्तिकीने आम्हाला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पैसे तिने अद्याप दिलेले नाही. जेव्हा आम्ही तिला कॉल करतो तेव्हा ती व्यग्र असल्याचं सांगते आणि फोन ठेवते. परत फोन करेन असं म्हणते पण तिचा फोन करतच नाही,” असा आरोप दोघांनी केला.
या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना कसं वागवलं गेलं, याबद्दल त्यांनी सांगितलं. “आमच्या चेहऱ्यांमुळे तिला हा पुरस्कार मिळाला, पण तिने आम्हाला ऑस्कर अवॉर्डला हात लावू दिला नाही. या डॉक्युमेंटरीनंतर आम्ही आमची शांतता गमावली. आम्ही मुंबईहून कोईम्बतूरला परत आल्यानंतर आमच्याकडे आमच्या घरी परतायचे पैसे नव्हते. आम्ही तिच्याकडे प्रवासासाठी पैसे मागितले, तेव्हा तिने सांगितलं की तिच्याकडे पैसे नाहीत आणि लवकरच ती व्यवस्था करेल,” असं या जोडप्याने सांगितलं.
कार्तिकीने कामाचे पैसे दिल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर आम्ही आमचे बँक खाते तपासले, ज्यात फक्त ६० रुपये होते, असा दावा जोडप्याने केला. याबद्दल विचारलं असता कार्तिकी म्हणाली की आम्ही पैसे दिले होते, पण ते पैसे कदाचित त्यांनी खर्च केले असतील.
निर्मात्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, यानंतर चित्रपट निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. “‘द एलिफंट व्हिस्परर्स’ तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट हत्तींच्या संवर्धनाविषयी जागरुकता वाढवणे, वन विभाग, माहूत, बोमन आणि बेली यांचे प्रयत्न लोकांसमोर आणणे हे होते,” असं निवेदनात म्हटलं आहे. पण त्यांनी बोमन व बेलीच्या आरोपांना उत्तर दिलेलं नाही.