रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाचे सर्वाधिक वर्चस्व असेलच, पण त्या जोडीला अनेक संस्मरणीय गोष्टी घडण्याची चिन्हे आहेत. हा सोहळा अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांवर तोंडसुख घेणारे सर्वात मोठे व्यासपीठ ठरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सिनेमासोबत अनेक सिनेबाह्य़ ऐतिहासिक नोंदीही या सोहळ्यात होण्याची चिन्हे आहेत. ऑस्करमधल्या स्पर्धकांचा आढावा घेणारा हा लेख..
कृष्णवंशीयांचा ऑस्कर?
ऑस्करमध्ये एकही कृष्णवंशीय नामांकन नसल्याची ओरड गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणावर झाली. यंदा सर्व मानाच्या पुरस्कारांच्या प्रत्येक गटात कृष्णवंशीय नाव आहे. लघुपटापासून तांत्रिक बाबींच्या गटामध्ये कृष्णवंशीयांची वर्णी आहे. परंतु पुरस्कार किती मिळतात, त्यावरून ऑस्कर अकादमी कौतुक वा टीकेची धनी होणार आहे. म्हणजे सिनेताकदीवर ला ला लॅण्डने बाजी मारली, तरी ऑस्करवर गोरेधार्जिणे असल्याची टीका होईल. त्यामुळे ला ला लॅण्डचे खिशातले पुरस्कार काही चित्रपट खेचून आणतील. यंदा निष्पक्षपातीपणाने असे किती पुरस्कार कृष्णवंशीयांच्या वाटेला येतील, ते उद्या कळणार आहे.
ऑस्कर सोहळ्यात दर वर्षी काही ना काही ऐतिहासिक घडत असते. यंदा त्याची मात्रा अंमळ अधिक आहे. ताकदीचे चित्रपट आणि कसलेल्या कलाकारांची कसोटी सारखीच आहे, मात्र नोंद घेतली जाईल अशा अनेक गोष्टी ऑस्करशी यंदा निगडित आहेत. यावर्षी १४ पारितोषिकांसाठी मानांकन मिळविणाऱ्या ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाला ११हून अधिक पारितोषिके मिळाली, तर तो एखाद्या चित्रपटाने पटकावलेल्या सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम असेल. दोन वर्षांपूर्वी कृष्णवंशीयांना एकही नामांकन दिले गेले नसल्यामुळे ऑस्कर अकादमीवर वर्णद्वेष्टेपणाची टीका झाली होती. ती धुऊन काढण्यासाठी म्हणून की काय, यंदा १८ नामांकने कृष्णवर्णीयांना आहेत. सवरेत्कृष्ट सिनेमापासून सर्वोत्तम-अभिनेत्री-अभिनेत्यांपर्यंत साऱ्यातच त्यांचे ठळक अस्तित्व आहे. त्यांना तीन-चार पुरस्कार लाभले, तरी तो ऐतिहासिकच असेल. पण या सर्वाहून अधिक महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात शब्दफटाक्यांची आतशबाजीने ऑस्करचे वातावरण ढवळणार आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांत मेरिल स्ट्रीपने डागलेल्या टीकेच्या तोफांहून अधिक मोठे शब्दयुद्ध आणि त्यानंतर काही दिवस माध्यमांना पुरेल इतका वृत्तदारूगोळा ऑस्करमधून मिळण्याची खात्री अनेकांना वाटते.
ऑस्कर सोहळ्याच्या बरोब्बर आदल्या दिवशी रॅझ्झी हा वर्षभरातील वाईट सिनेमांसाठी आणि तद्दन फोकनाड अभिनयासाठी पुरस्कार सोहळा होतो. गेली ३७ वर्षे त्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. कारण शेवटी जगात वाईट आहे म्हणून चांगल्याला महत्त्व आहे. यंदा रॅझी पुरस्कारावर ‘बॅटमन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ या झ्ॉक स्नायडर दिग्दर्शित सिनेमाची पुरस्कारांसाठी आघाडी आहे. जशी ऑस्करवर ‘ला ला लॅण्ड’ या डेमियन चेजेल यांच्या चित्रपटाची छाप आहे. ‘ला ला लॅण्ड’च्या प्रदर्शनाचाही कदाचित भारतात विक्रम होणार आहे. गेले कित्येक महिने तो आपल्याकडच्या शहरी चित्रपटगृहांमध्ये ठाण मांडून बसलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्कर विजेते चित्रपटही फार तर दोन किंवा तीन आठवडे मल्टिप्लेक्समध्ये मिरवितात. पण ला ला लॅण्ड गेल्या तीनएक महिन्यांहून अधिक काळ चित्रगृहांमध्ये गाजतोय. दिग्गज संगीत कण्डक्टर आणि नवखा ड्रमर यांच्यातील संगीतबंध आणि हेवेदावे अपारंपरिक तरी खिळवून ठेवणाऱ्या कथेतून मांडणाऱ्या डेमियन चेजेलच्या ‘व्हिपलॅश’ची वर्णी दोन वर्षांपूर्वी ऑस्करवर लागली होती. यंदा त्या चित्रपटाहून अधिक सशक्त अभिनेते-अभिनेत्यांची फौज उभारून या दिग्दर्शकाने सर्वाधिक ऑस्कर पटकवण्याची क्षमता असलेला सिनेमा उभारला आहे. रायन गॉसलिंग आणि एमा स्टोन यांच्या मुलाखती-लेखांनी गेल्या तीन महिन्यांत मासिके-दैनिकांची मुखपृष्ठकथा साजऱ्या झाल्या. मुंबई-पुण्याकडे या कलावंतांचे भक्त कदाचित बॉलीवूड सिनेमांहून अधिक असतील, इतके या सिनेमाने तरुणाईवर गारुड केले आहे. एका साध्याशा सांगीतिक प्रेमकथेतून आयुष्यातील यश आणि तडजोड यांच्यावर सूक्ष्मलक्षी दृष्टिक्षेप टाकणाऱ्या या चित्रपटाला ऑस्करची नामांकने मिळण्याआधीच जगभरातील प्रेक्षकांनी मान्यता दिली आहे. ‘सिटी ऑफ स्टार’ आणि ‘ऑडिशन’ या गाण्यांचे स्थान मोबाइलमधल्या प्लेलिस्टमध्ये, आयपॉडमध्ये महत्त्वाचे बनले आहे. गेल्या काही वर्षांत सांगीतिका चित्रप्रकाराला ओहोटी लागली होती. जॉन कार्नी या आयरिश दिग्दर्शकाच्या ‘वन्स’, ‘बिगिन अगेन’ आणि या वर्षी आलेल्या ‘सिंग स्ट्रीट’ या चित्रत्रयीने मात्र सिनेभावूक बनविणारे उत्तम संगीत चित्रपट बनवले. त्यातील वन्सच्या ‘फॉलिंग स्लोली’ या गाण्याला ऑस्कर मिळाले होते. ‘बिगिन अगेन’ हा ‘बर्डमॅन’ चित्रपटाने ऑस्कर पटकावले, त्या वर्षांतला सर्वाधिक सुंदर संगीत चित्रपट होता. आज ‘ला ला लॅण्ड’च्या सांगीतिकेला पसंती मिळण्यात कार्नीच्या सिनेमांनी तयार झालेला संगीतहळवा प्रेक्षकवर्गच मोठा आहे. ‘ला लॅण्ड’ यंदाच्या ऑस्करमध्ये इतिहास घडवण्याची शक्यता अधिक आहे. त्याला सर्वाधिक पुरस्कार मिळाले तरी आणि मिळाले नाही तरी इतिहास घडेलच. कारण त्याच्या वाटेचे पुरस्कार एकतर कृष्णवंशीयांकडेच जातील इतके तगडे स्पर्धक यंदा तिथे आहेत. कृष्णवंशीय दिग्दर्शकाच्या ‘मूनलाइट’चे महत्त्व सध्याच्या अमेरिकी वातावरणात सर्वात महत्त्वाचे असल्याने, फेन्स आणि हिडन फिगर यांचे विषय ट्रम्पयुगात कृष्णवर्णीयांचे राष्ट्रप्रेम दर्शविणारे असल्याने पुरस्कारांवरची ‘ला ला लॅण्ड’ची पकड सुटल्यासही ऐतिहासिक नोंदीच या वर्षी होणार आहेत. ऑस्करमधील काळे-गोरे हा भेद पुरस्कारांच्या विभागणीतून लक्षात येणार आहे.
आम्हाला वाटते..
तुल्यबळ स्पर्धक..
‘ला ला लॅण्ड’ने १२ किंवा नामांकनातील सर्व १४ पुरस्कार मिळविले, तर तो कदाचित न मोडणारा विक्रम बनेल. १९२९ पासून ऑस्करमध्ये असा विक्रम कोणत्याच चित्रपटाबाबत झालेला नाही. शिवाय ऑस्करच्या हयातीत सर्वाधिक नामांकन मिळालेल्या चित्रपटांना कधी सर्वाधिक पुरस्कार वाटेला आले नाही, असा इतिहास आहे. हे क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटनपासून (१३ नामांकने आणि फक्त तांत्रिक गटातील ३ ऑस्कर) मागे जाताना स्टीवन स्पीलबर्गच्या कलर पर्पल (११ नामांकने आणि शून्य पुरस्कार) या कृष्णवंशीयांवरच्या सिनेमाबाबतचे दाखले घेऊन म्हणता येईल. यंदा ‘ला लॅण्ड’ला एखाद्या गटात पुरस्कार नाही मिळाला, तर तो मिळविण्यासाठी इतरांमध्ये तुंबळयुद्ध आहे. पण या चित्रपटाचा एकूण दबदबा पाहता इतरांसाठीची शक्यता कमी आहे. तरी गणिते बदललेली असू शकतात.
सवरेत्कृष्ट पटकथा
‘अरायव्ह’ल हा चित्रपट आतापर्यंत आपण पाहिलेल्या सर्व परग्रहवासीयांच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असल्याने आणि त्याची आणि ‘मॅन्चेस्टर बाय द सी’ या चित्रपटांची पटकथा फारच कठीण वाटत असल्याने हे पटकथेच्या पुरस्कारासाठी दावेदार ठरू शकतात. ‘ट्वेन्टी सेन्चुरी वुमन’ आणि ‘हेल ऑर हाय वॉटर’ या चित्रपटांच्या पटकथाही सुंदर आहेत. ‘ला ला लॅण्ड’वर हा विभाग मेहरबान न झाल्यास, पुरस्कार कोणाकडे जातो, हे पाहणे कुतूहलाचे आहे.
सवरेत्कृष्ट चित्रपट
‘ला लॅण्ड’चा हा मान चित्रपटाच्या घोडदौडीत कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. तरी ‘मुनलाइट’ आणि ‘हेल ऑर हाय वॉटर’ या पुरस्कारासाठी तुल्यबळ आहेत. ‘मुनलाइट’मध्ये असलेली काळी अमेरिका ऑस्कर घेऊन गेली, तर तिचे ‘स्लमडॉग मिलिऑनेर’प्रमाणे ऑस्कर उत्तर काळात विश्लेषण केले जाईल.
सवरेत्कृष्ट परभाषिक सिनेमा
या चित्रपटांमध्ये स्वीडनचा मॅन कॉल्ड ओव्ह आणि जर्मनीच्या टोनी एडर्म्मन या चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे. फ्रेडरिक बेकमन यांच्या मॅन कॉल्ड ओव्ह याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. जगभरात २०१२ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे विद्युतवेगाने अनुवाद झाले आहे. टोनी एर्डमन किंवा या चित्रपटाला ऑस्कर न मिळाल्यास ‘सेल्समन’ हा इराणचा चित्रपट परभाषिक गटातला दावेदार आहे. असगर फराहदी यांना काहीच वर्षांपूर्वी सेपरेशनसाठी पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे त्यांच्या या चित्रपटालाही पुरस्कार मिळतो का, हा मोठा प्रश्न आहे.
सर्वोत्तम अभिनेता
रायन गॉसलिंग आणि केसी अफ्लेक तुल्यबळ स्पर्धक आहेत. मॅन्चेस्टर बाय द सीसाठी निर्विकार, निरिच्छ व्यक्तीची त्याने केलेली भूमिका आणि मोजक्या संवादात त्याचा लक्षात राहणारा आवाज यंदा ‘ला ला लॅण्ड’च्या ताब्यातील पुरस्कार मिळवितात का हे कोडे परवा सुटणार आहे. पण या दोघांकडून तो पुरस्कार सुटला तर तो डेन्झल वॉशिंग्टनकडे फेन्ससाठी गेलेला असेल. साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मेहर्शाला अली याला मुनलाइटसाठी मिळणे अभिप्रेत आहे. इथे ‘ला ला लॅण्ड’ला नामांकन नसल्याने तगडी स्पर्धा हेल ऑर हाय वॉटरमधील जेफ ब्रिजेसच्या नोकरीतला शेवटचा दिवस गाजविणाऱ्या पोलिसाच्या भूमिकेत आणि मायकेल शेनॉनने नॉक्टर्नल अॅनिमलसाठी केलेल्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आहे. भारत सोडून इतर जगासाठी स्लमडॉग पार्ट-२ बनलेल्या ‘लायन’ या चित्रपटातील देव पटेल याच्या वाटेला आलेली भूमिका त्यापुढे सर्वात दुबळी आहे.
सर्वोत्तम अभिनेत्री
‘ला ला लॅण्ड’च्या एमा स्टोनला पुरस्कार मिळाला, तर तो चित्रपटाच्या पुरस्कारपुण्याईवरच मिळालेला असेल. कारण या विभागात फ्रेंच चित्रपट ‘एल’साठी दाखल झालेले इझाबेल हुपेअरची व्यक्तिरेखा यंदा सर्वोत्तम अभिनेत्रीचा सर्वात तगडा दावेदार आहे. फ्रेन्च चित्रपट असला, तरी मुख्यधारेतल्या अमेरिकी इंग्रजी चित्रपटांच्या पंगतीत दाखल होणे, हेच त्या भूमिकेतील सशक्तपणा अधोरेखित करणारे आहे. त्यापुढे मेरिल स्ट्रीप (फ्लॉवर फॉस्टर जेन्कीन्स )आणि रूथ नेगा (लव्हिंग) प्रभाव पाडतील असे चित्र नाही. सवोत्तम साहायक अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील ला ला लॅण्डचे कुणीच दावेदार नसल्याने अवघड बनला आहे. पण फेन्ससाठी व्हायोला डेव्हिस , मुनलाइटसाठी नओमी हॅरिस आणि हिडन फिगर्ससाठी ऑक्टोव्हिया स्पेन्सर या तीन कृष्णवंशीयांपैकी कुणाही एकाकडे तो जाऊ शकतो.