सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पटकावणारा ‘ग्रीन बुक’ भारतातही प्रदर्शित झाला आहे. रिलायन्स एंटरटेन्मेटनं हा चित्रपट १ मार्चपासून भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होईल असं जाहिर केलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा ऑस्करही या चित्रपटाला मिळला आहे. हा चित्रपट आजपासून भारतीयांना पहायला मिळणार आहे.
१९६० च्या दशकात हजारो मैलांचा प्रवास करण्यासाठी निकड म्हणून एकत्र यावे लागणाऱ्या दोन व्यक्तींची कथा ‘ग्रीन बुक’मध्ये पहायला मिळते. डॉन शर्ली या कृष्णवर्णीय इटालियन पियानो वादकाला अमेरिकेच्या दक्षिणी प्रांतांमध्ये कॉन्सर्ट करण्यासाठी जायचं असतं. विशेष दौऱ्यासाठी महिनोन् महिने चालणाऱ्या प्रवासात चालक आणि सुरक्षारक्षक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडण्याचं काम टोनी लिप अंगरक्षक नाइलाजानं स्विकारतो . जात्याच कृष्णवंशीय व्यक्तींवरील असेलेला राग चांगल्या आर्थिक मोबदल्यासाठी विसरून टोनी चालक बनण्यास तयार होतो.
Winner of 3 #AcademyAwards… Reliance Entertainment brings #GreenBook back in theatres on 1 March 2019. pic.twitter.com/pt2hmLiLM9
— taran adarsh (@taran_adarsh) February 28, 2019
करारपत्रानुसार मोबदल्यासह त्याला शर्लीच्या रेकॉर्ड कंपनीकडून एक ‘ग्रीन बुक’ प्राप्त होतो, ज्यात भेदभाव प्रचलित असलेल्या भागातून प्रवास करताना कृष्णवंशीय नागरिकांना राहण्यासाठी आणि त्यांच्या सोयी-सुविधांची माहिती लिहिलेली असते. या ‘ग्रीन बुक’च्या मदतीनं दोघंही प्रवासाला सुरूवात करतात. या हजारो मैलाच्या प्रवासात अनेक प्रसंग येतात ज्यानं दोघांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. साधारण अशा कथानकावर हा चित्रपट आधारलेला आहे.
अनपेक्षितरित्या या चित्रपटाला २०१९ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला. अमेरिकेतील वंशभेदाचा प्रश्न ग्रीन बुकमध्ये योग्य प्रकारे हाताळला गेला नाही अशी टीकाही या चित्रपटावर करण्यात आली होती. ग्रीन बुकला ऑस्कर मिळाल्यानंतर अनेकांनी आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती.