दी बोहेमियन ऱ्हाप्सडी चित्रपटाचा मुख्य अभिनेता रॅमी मॅलेकने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्रायन सिंगर यांनी केले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेता या नामांकन गटात ख्रिश्चन बेल, ब्रॅडली कूपर, विल्यम डेफो, व्हिगो मोर्टन्सन हे इतर चार स्पर्धक होते. या चारही स्पर्धकांनी आपापल्या चित्रपटांतून केलेले अभिनय वाखाण्याजोगे होते. दरम्यान सिनेक्षेत्रातील अंदाजपंडित व रसिक मंडळींनी आपापले अंदाज वर्तवले. अनेकांना व्हॉइस चित्रपटाचा नायक ख्रिश्चन बेल हा ऑस्कर पुरस्कार पटकावेल अशी अपेक्षा होती. परंतु अनेकांचे अंदाज फोल ठरवत रॅमी मॅलेकने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले.

अभिनेता रॅमी मॅलेकने या चित्रपटात फ्रेडी मर्क्युरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. वरकरणी सामान्य वाटणारी ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक होती. परंतु संपूर्ण चित्रपट जणू त्याच्याच भोवती फिरावा इतका रॅमी त्या व्यक्तिरेखेशी एकरुप झालेला दिसतो. एक अभिनेता म्हणून रॅमीची कारकीर्द फार मोठी नाही परंतु कोणत्याही पूर्वग्रहाला बळी न पटता त्याने दाखवलेली त्याच्या अभिनयावरची पकड, भूमिकेचा अभ्यास आणि पडद्यावरच्या त्याच्या बारीकसारीक हालचाली या नक्कीच कौतुकास्पद आहेत. चित्रपटाच्या आशयातील मर्म त्याच्या सादरीकरणात परावर्तीत झालेले दिसते. थोडक्यात काय तर उत्कृष्ट अभिनयाचे सुरेख प्रदर्शन रॅमी मॅलेकने केले आहे. आणि म्हणूनच सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा तो मानकरी ठरला.

Story img Loader