Oscar 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा आज (१३ मार्च) रंगताना दिसत आहे. यंदाच्या या सोहळ्यातील अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि आज झालेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. यापाठोपाठ ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून यात काम करणाऱ्या मलेशियन अभिनेत्री मिशेल योह हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
हाँग काँगच्या या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून या चित्रपटाने आणखी एक इतिहास रचला आहे. ऑस्करच्या ९५ वर्षाच्या इतिहासात मिशेल योह ही पहिली आशियातील महिला आहे जीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. यामुळे तिची अधिक चर्चा होताना दिसत आहे, शिवाय मिशेल योह हिला हे प्रथमच ऑस्कर नामांकन मिळालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑस्कर स्वीकारताना मिशेल योह प्रचंड भावूक झाली. ती म्हणाली, “माझ्यासारखे दिसणारे सर्व तरुण मुले आणि मुली आज रात्री मला जे पहात आहेत, त्यांच्यासाठी हा आशा आणि शक्यतांचा किरण आहे. मोठी स्वप्नं पाहा आणि हो स्वप्नं खरी ठरतात.” मिशेलनी तिला मिळालेला हा पुरस्कार आपल्या ८३ वर्षाच्या आईला समर्पित केला आहे. याआधी मिशेल योहला गोल्डन ग्लोब पुरस्कारानेही सन्मानित केलं होतं. यावर्षी तिच्या या चित्रपटाला ११ नमांकनं मिळाली.