Oscars 2024: ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळा आज पहाटे पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये २०२४मधील ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ऑस्कर सोहळा हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा मानला जातो. हॉलीवूड असो किंवा बॉलीवूड प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं ऑस्कर पुरस्कार मिळवण्याचं. यंदा अनेक कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार ‘पूअर थिंग्ज’ चित्रपटातील एमा स्टोनला मिळाला आहे. तर ‘ओपेनहाइमर’मधील अभिनेता सिलियन मर्फीला हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. तसंच याच चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही ‘ओपेनहायमर’ चित्रपटाने जिंकला आहे. अशातच सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही २७ वर्षांची अभिनेत्री ऑस्करच्या रेड कार्पेटवर पडली; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
हेही वाचा – Oscar 2024 : …अन् रेसलर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, पाहा व्हिडीओ
या २७ वर्षीय अभिनेत्रीचं नाव लिझा कोशी (Liza Koshy) असं आहे. लिझा ऑस्करच्या रेड कार्पेटवर पोज देत होती. यावेळी ती लाल रंगाच्या लॉन्ग ऑफ-शोल्डर गाउनमध्ये होती. जेव्हा तिच्या एका ठिकाणी पोज देऊन झाल्या तेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी पोज देण्यासाठी जात होती. तितक्यात तिचा पाय घसरला आणि ती पडली. पण अभिनेत्रीने हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने हाताळला.
लिझा उभी राहिली आणि तिने मस्करी करत घडलेल्या प्रकारकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, “तिथे एक मॅनहोल होता तुम्ही सर्वांनी पाहिलात का?” त्यावर एका विचारले, “कुठे आहे? ठीक आहे का?” तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “मी ठीक आहे. मी माझा विमा काढला आहे. त्यामुळे काही समस्या नाही.” त्यानंतर लिझा माध्यमांशी संवाद साधताना गंमतीत म्हणाली, “ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इतकी उत्साही होती की रेड कार्पेटवरचं येऊन पडली.”
लिझाबद्दल सांगायचं झालं तर, ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून युट्यूबर देखील आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘प्लेअर्स’मुळे लिझाला लोकप्रियता मिळाली होती.