Oscars 2025 Live Streaming : ९७ व्या अकादमी पुरस्कारांची म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ बद्दल जगभरात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. मनोरंजन विश्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराची जगभरातील प्रत्येक कलाकार आतुरतेने वाट पाहत असतो. भारतातील सिनेप्रेमी सुद्धा हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. दरवर्षीप्रमाणे, ९७ व्या अकादमी पुरस्कारांचं कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.
कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये २ मार्चला हा भव्य रेड कार्पेट सोहळा पार पडणार असून लेखक, निर्माता आणि प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळखला जाणारा कॉनन ओ’ब्रायन यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कॉनन ओ’ब्रायन याने पहिल्यांदाच ऑस्कर होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी त्याने २००२ आणि २००६ मध्ये एमी पुरस्कार होस्ट केले होते.
भारतातील सिनेप्रेंमींना ऑस्करचं थेट प्रेक्षपण लाइव्ह घरबसल्या कुठे पाहता येईल याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘ऑस्कर २०२५’ हा सोहळा भारतीय वेळेनुसार ३ मार्च म्हणजेच सोमवारी पहाटे ५:३० वाजता ‘जिओ स्टार’वर लाइव्ह पाहता येणार आहे. याशिवाय ‘स्टार मूव्हीज’, ‘स्टार मूव्हीज सिलेक्ट’ या टिव्ही वाहिन्यांवर देखील प्रेक्षकांना ऑस्कर पाहता येणार आहे. या सोहळ्याचा रिपीट टेलिकास्ट सुद्धा रात्री ८:३० वाजता याच दोन वाहिन्यांवर करण्यात येणार आहे.
‘ऑस्कर २०२५’मध्ये भारतीय सिनेप्रेमींचं लक्ष ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मवर असणार आहे. अॅडम जे ग्रेव्हज दिग्दर्शित ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मची निर्मिती गुनीत मोंगा, प्रियांका चोप्रा आणि अन्य काही जणांनी मिळून केली आहे. या शॉर्टफिल्मला सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन) या श्रेणीत नामांकन मिळालं आहे. गुनीत मोंगा यांनी यापूर्वी २०२३ मध्ये ‘द एलिफंट व्हिस्परर्स’साठी ऑस्कर जिंकला आहे.
The 97th Academy Awards streaming LIVE, March 3, 5:30 AM onwards, only on #JioHotstar! #OscarsOnJioHotstar https://t.co/V1TapnaHkc
— JioHotstar (@JioHotstar) February 27, 2025
दरम्यान, यावर्षी बऱ्याच विलंबानंतर २०२५ च्या ऑस्कर नामांकनांची अधिकृत घोषणा २३ जानेवारी रोजी करण्यात आली होती. लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे नामांकन जाहीर करण्यास विलंब झाला होता. आता हा भव्यदिव्य सोहळा भारतीय वेळेनुसार सोमवारी ३ मार्चला पहाटे ५:३० ला सुरू होईल.