सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्काराचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. करोनामुळे दोन वेळा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. अखेर येत्या २७ मार्चला ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात ऑस्कर कधी आणि कसा पाहता येणार?

ऑस्कर पुरस्कार म्हणजेच ९४ व्या अकादमी पुरस्कार सोहळा रविवारी २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे ५.३० वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. हा सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टार Disney + Hotstar वर लाइव्ह पाहता येणार आहे.

त्यासोबतच स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर सकाळी ६.३० वाजता हा सोहळा प्रसारित होईल. तसेच ऑस्करच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचे लाइव्ह अपडेट देण्यात येणार आहेत. तुम्हाला जरी हा कार्यक्रम पाहता आला नाही तरी Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तो उपलब्ध असणार आहे.

यंदाचे होस्ट कोण?

तब्बल 3 वर्षांनंतर अकादमी पुरस्कारांचे आयोजन केले जात आहे. गेल्या तीन वर्षापासून हा पुरस्कार सोहळा करोना महामारीमुळे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे हा सोहळा कोणीही होस्ट करत नव्हते. मात्र यंदा अखेर या सोहळ्याचे होस्ट परतले आहेत. विशेष म्हणजे केवळ एक नव्हे तर यंदा तीन सेलिब्रिटी हा शो होस्ट करताना दिसणार आहे.

एमी पुरस्कार विजेती लेखिका आणि कॉमेडियन वांडा सायक्स, स्टँड-अप कॉमेडियन एमी शूमर आणि अभिनेत्री रेजिना हॉल या तिघीजणी मिळून ९४ व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करणार आहेत.

विश्लेषण : ऑस्करसाठीचे नामांकन आणि विजेते कसे निवडले जातात? जाणून घ्या…

‘द पॉवर ऑफ डॉग’ चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने

९४ व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली आहेत. तर भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाचा समावेश झाला. मात्र इतर कोणत्याही भारतीय चित्रपटाला यंदाच्या ऑस्करसाठी स्थान मिळालेले नाही. 

Story img Loader