ओटीटी’चे अनेक प्रेक्षक असे आहेत ज्यांना निखळ मनोरंजन करणाऱ्या, डोक्याला फार ताण न देणाऱ्या हलक्याफुलक्या मालिका किंवा सिनेमे पाहायला आवडतात. अशा प्रेक्षकांसाठी दोन धमाल प्रेमकथा ‘ओटीटी’वर आल्या आहेत. दुसऱ्याने केलेला घोळ निस्तरता निस्तरता प्रेमाची होणारी परीक्षा हा समान धागा या दोन्ही कथांमध्ये आहे. यापैकी एक आहे नेटफ्लिक्सवरील सिनेमा ‘धूम धाम’ तर दुसरी जिओ स्टारवरील वेबमालिका – ‘उप्स! अब क्या?’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नापर्यंत कौमार्य अबाधित ठेवण्याचं वचन आजीला दिलेली एक मुलगी हे वचन पाळूनही लग्नाआधीच गर्भवती राहते. या विचित्र परिस्थितील ‘‘उप्स! अब क्या?’ ही वेबसिरीज फार मजेशीर पद्धतीने साकारते.

रूही (श्वेता बसू प्रसाद) यूटीआय चाचणीसाठी रुग्णालयात जाते, पण डॉक्टर तिच्या गर्भाशयात ‘आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन’द्वारे शुक्राणू ‘इंजेक्ट’ करते आणि या गोंधळामुळे ती गर्भवती राहते. हे शुक्राणू नेमका तिचा बॉस असलेल्या समर (आशिम गुलाटी) चे असतात. कर्करोगातून बचावलेल्या समरचं हे शेवटचं निरोगी स्पर्म असतं. त्याला आणि त्याच्या पत्नीला काहीही करून हे मूल हवं असतं. रूही आणि तिचा प्रियकर ओमकार (अभय महाजन) या परिस्थितीचा कसा सामना करतात. यात भर म्हणून आणखी काय काय घडत जातं हे पाहणं मनोरंजक आहे.

ही वेबमालिका म्हणजे ‘ट्विस्ट आणि टर्न्स’ची एक ‘रोलरकोस्टर राइड’च आहे, ज्यात बसून तुम्ही हे रोमांचकारी प्रसंग अनुभवता. काही ठिकाणी नाट्यमयतेचा अतिरेक आहे. तो दुर्लक्षिला तर ही मालिका मनोरंजनाचे काम उत्तम पार पाडते. बोनस म्हणून सोनाली कुलकर्णी आणि जावेद जाफरी यांचे उपकथानक भर घालते. पुरुषांविना खमकेपणी जगणाऱ्या तीन पिढ्यांच्या महिला, त्यांचे आपापसातील मजबूत बंध हा या मालिकेचा जीव आहे.

ही वेबमालिका प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो ‘जेन द वर्जिन’ची अधिकृत रिमेक आहे. पण ज्यांनी मूळ मालिका पाहिलीय किंवा तिच्याशी तुलना करायची आहे, त्यांना ही मालिका रुचणार नाही. उपहास हा ‘जेन द वर्जिन’चा गाभा आहे, पण उप्स! अब क्या? मध्ये तो येत नाही. या मालिकेत ‘जेन द वर्जिन’चं भारतीयीकरण करण्यात आलं आहे.

उप्स! अब क्या?

दिग्दर्शक – देबात्मा मंडल, प्रेम मिस्त्री

कलाकार – श्वेता बसू प्रसाद, आशिम गुलाटी, अभय महाजन, सोनाली कुलकर्णी, अपारा मेहता, जावेद जाफरी

ओटीटी – जिओ हॉटस्टार

धूम धाम सिनेमाची कथा एका रात्रीची आहे. वीर पोद्दार आणि कोयल चढ्ढा यांचे अरेंज मॅरेज झालेले असते. घाईघाईत दोन आठवड्यांत ठरलेल्या लग्नात दोघांना एकमेकांना जाणून घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी दोघे हॉटेलवर येतात. दाराची बेल वाजते. दार उघडताच दोघे जण आत शिरून थेट या नवरदेवावर बंदूक ताणतात. प्रश्न एकच ‘चार्ली कुठे आहे?’ या चार्लीच्या शोधात रात्रभर सुरू असलेली पळापळ म्हणजे हा सिनेमा.

जुळवून केलेला विवाह, अशा जोडप्यांचे एकमेकांना समजून घेणे, अरेंज्ड मॅरेजच्या अधिक-उण्या बाजू, मुलींचे स्वातंत्र्य या गोष्टींवर सिनेमा प्रकाश टाकतो. उत्कंठा, गुन्हेगारीची फोडणीही आहे. पण सिनेमात नावीन्यता नाही. काही प्रसंगांचे तर प्रेक्षक आधीच अंदाज बांधू शकतात. प्रतीक गांधी आणि यामी गौतम यांनी आपल्या वाट्याची अभिनयाची जबाबदारी मात्र उत्तम पार पाडली आहे.

घटकाभराचे मनोरंजन करण्यापलीकडे हा सिनेमा फार काही साधत नाही. पण आधी म्हटल्याप्रमाणे ‘हलकेफुलके मनोरंजन’ या व्याख्येत हा सिनेमा चपखल बसतो.

धूम धाम

दिग्दर्शक – ऋषभ सेठ

कलाकार – यामी गौतम, प्रतीक गांधी, प्रतीक बब्बर

ओटीटी – नेटफ्लिक्स