मुंबई : ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (इफ्फी) हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबरपासून गोव्यात पणजी येथे सुरू होत आहे. या महोत्सवात गेल्या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट वेबमालिकेसाठी पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारांसाठी पाच वेबमालिका स्पर्धेत असून निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन’ या वेबमालिकेचाही यात समावेश आहे.
दरवर्षी देशभरातील चित्रपटांबरोबरच दर्जेदार आंतरराष्ट्रीय चित्रपटांनाही पुरस्काराने गौरवणाऱ्या इफ्फी या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आता ओटीटी या नव माध्यमाचीही दखल घेण्यात आली आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या इफ्फी महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेबमालिका हा पुरस्कार देण्यात येणार असून यंदा या पुरस्कारासाठी ५ वेबमालिकांना नामांकन मिळाले आहे. देशभरातील १० नामांकित ओटीटी कंपन्यांनी या पुरस्कारांसाठी अर्ज दाखल केले होते. गेल्यावर्षीपेक्षा यंदा या पुरस्कारांसाठी दाखल झालेल्या अर्जात ४० टक्क्याने वाढ झाली आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आलेल्या अर्जांपैकी या पुरस्कार विभागात ‘नेटफ्लिक्स’वरील ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘काला पानी’ या दोन वेबमालिका, ‘सोनी लिव्ह’ वाहिनीवरील ‘लंपन’ ही मराठी वेबमालिका, ‘अयाली’ ही ‘झी ५’ वाहिनीवरील तमिळ वेबमालिका आणि ‘प्राईम व्हिडिओ’वरील ‘ज्यूबिली’ ही हिंदी वेबमालिका अशा पाच वेबमालिकांना नामांकन देण्यात आले आहे. या पाचपैकी सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या वेबमालिकेला १० लाख रुपये रोख पुरस्कार स्वरूपात मिळणार असून वेब मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक दोघांनाही यावेळी गौरवण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> ‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?
इफ्फी फिल्म बाजारसाठी चार मराठी चित्रपटांची निवड
मराठी चित्रपटाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी चित्रपट इफ्फी फिल्म बाजार विभागासाठी पाठवला जातो. यंदा या विभागात ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘तेरवं’, ‘विषय हार्ड’ आणि ‘छबिला’ या चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेता – दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, छायाचित्रणकार – दिग्दर्शक महेश लिमये, संगीतकार अमितराज सावंत आणि ज्येष्ठ पत्रकार मीना कर्णिक या पाच परीक्षकांच्या निवड समितीने या चार मराठी चित्रपटांची निवड केली.
इफ्फी चित्रपट बाजारातील वर्क-इन-प्रोग्रेस (डब्ल्यूआयपी) लॅब उपक्रमातही पाच चित्रपट
नव्या प्रतिभावंतांच्या कलाकृतींना संधी देण्यासाठी इफ्फी चित्रपट बाजारात ‘वर्क इन प्रोग्रेस लॅब’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ बादी यांचा ‘उमल’ (मराठी), त्रिवेणी राय यांचा ‘शेप ऑफ मोमोज’ (नेपाळी), शक्तीधर बीर यांचा ‘गांगशालिक – रिव्हर बर्ड’ (बंगाली), मोहन कुमार वालासला यांचा ‘येरा मांडरम’ (तेलुगु), रिधम जानवे यांचा ‘काट्टी री राट्टी’ (गड्डी, नेपाळी) आणि विवेक कुमार यांचा ‘द गुड, द बॅड, द हंग्री ‘ (हिंदी) या चित्रपटांचा समावेश आहे.