अभिनेता रणवीर शौरी आपल्या सहज, सोप्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा विनोदी, गंभीर अशा कोणत्याही भूमिकेत चपखल बसणारा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. ‘खोसला का घोसला’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘सिंग इज किंग’ अशा अनेक सिनेमात त्याने उत्तम काम केलं आहे. भूमिका लहान असो की मोठी रणवीर अगदी खराखुरा वाटावा असा अभिनय करून भाव खाऊन जातो. सध्या हा अभिनेता ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसर्‍या पर्वामुळे चर्चेत आहे. रणवीरने या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. याच एपिसोडची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात तो एका स्पर्धकाबरोबर बोलताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ‘काम असतं तर या शोमध्ये आलो नसतो,’ असं म्हणताना रणवीर दिसत आहे.

‘भैय्या तुम्ही काय करता?’ असा प्रश्न एक महिला स्पर्धक रणवीरला विचारते. यावर रणवीर म्हणतो, “मी अभिनेता आहे.” त्यावर ती स्पर्धक म्हणते तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे. त्यावर रणवीर म्हणाला, “मी १९९९ की २००० मध्ये ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ हा माझा पहिला सिनेमा केला होता”. तुम्ही कोणत्या भूमिका करता हिरो की व्हिलन? तिच्या या प्रश्नावर रणवीर म्हणाला की त्याला मिळेल त्या भूमिका तो करतो. या संभाषणाच्या शेवटी तुमचं काम कसं सुरू आहे? या प्रश्नाने होतो. “माझ्याकडे काम असतं तर मी इथे नसतो,” असं रणवीर म्हणतो.

हेही वाचा…“आजही काही भागांत बहुपत्नीत्व…” बिग बॉस ओटीटीफेम अरमान मलिकसाठी उर्फीची पोस्ट

व्हिडीओमधील या संभाषणावर लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काही नेटकरी रणवीरबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. रणवीर हा खूप गुणी पण दुर्लक्षित राहिलेला अभिनेता असून त्याला कोणीही या शोमध्ये ओळखत नाही हे खरं आहे. पण यामुळे प्रेक्षकांसाठी कोणत्या प्रकारचा कंटेंट महत्वाचा आहे हे दिसून येतं, ही मानसिकता बदलायला हवी असं एका युजरने लिहिलं आहे. तर स्पर्धकाच्या प्रश्नाचं उत्तर न देता रणवीर त्याचा अपमान झाला असं म्हणून उठून जाऊ शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. बॉलीवूडमध्ये प्रतिभावान लोकांना संधी मिळत नाही, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता की मी बिग बॉसमध्ये तेव्हाच जाईन जेव्हा मला आयुष्याचा त्याग करावासा वाटेल. आता तो बिग बॉसमध्ये आल्यावर त्याच्या या वक्तव्याचीही चर्चा आहे. यावेळी बिग बॉसमध्ये भाग घेण्याचं कारण रणवीरने शोमध्ये जाण्याआधी सांगितलं. “बिग बॉसचे निर्माते मला दरवर्षी फोन करतात मात्र मी व्यग्र असल्याने त्यांना नकार द्यायचो. मात्र या वर्षी माझा मुलगा त्याच्या आई बरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेर गेला आहे. म्हणून मी एक महिना हाती वेळ असल्याने काहीतरी वेगळं करूयात म्हणून या शोची ऑफर स्वीकारली,” असं रणवीरने म्हटलं होतं.

हेही वाचा…अभिनेत्री सई लोकूरने पहिल्यांदाच शेअर केला लेक ताशीबरोबरचा फोटो, म्हणाली, “ती एकदाही रडली…”

रणवीर गेल्या २५ वर्षांपासून सिनेक्षेत्रात आहे. त्याने ‘चांदनी चौक टू चायना’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स’ अशा सिनेमांमधून तर ‘सॅक्रेड गेम्स २’, ‘सनफ्लॉवर’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच त्याचा ‘अॅक्सिडंन्ट ऑर कॉन्स्पिरसी : गोध्रा’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. गुजरातमधील गोधरा हत्याकांडावर आधारित हा सिनेमा आहे.