अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ (Breathe: into the shadows) या वेब सीरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चन, नित्या मेनन, अमित साध आणि सैयामी खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये होते. २०२० मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. या लोकप्रिय सीरिजद्वारे अभिषेक बच्चनने ओटीटी विश्वामध्ये पदार्पण केले होते. एकाच वेळी दुहेरी भूमिका केल्याने त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. अभिषेकचे चाहते या सीरिजच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकतंच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतिक्षित सिरीज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन २ चा टीझर प्रदर्शित केला आहे. अबुदंतिया एंटरटेनमेंट आणि विक्रम मल्होत्रा ​द्वारे निर्मित, मालिकेचा दुसरा भाग एक आकर्षक थ्रिलरचा अनुभव देत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करत आगामी सीझनचा टीझर दर्शकांना गोंधळात टाकणारे प्रश्न सोडवणार आहे. रावणाला उर्वरित ६ बळी मिळतील का? कबीर हत्या थांबवू शकेल का? अविनाश आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कुठपर्यंत जाणार? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं या सीझनमध्ये मिळणार आहेत.

आणखी वाचा : मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील काजोलचा ग्लॅमरस लूक; शिमरी साडीची किंमत तब्बल….

अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर, इवाना कौर हे त्यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार असून या पुढच्या भागायत्त नवीन कस्तुरियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे.

या नवीन सीझनमध्ये आणखी कोणती रहस्यं उलगडणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. लवकरच यांचा ट्रेलरही समोर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडो’ सीझन २’ ९ नोव्हेंबर रोजी तब्बल २४० देशात प्रसारित होणार आहे. अभिषेक बच्चनच्या या सीरिजसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

Story img Loader