‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती. आता ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, पहिल्या दोन सीजनप्रमाणेच हा सीजनदेखील लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र, अनेकांनी या तिसऱ्या सीजनमध्ये मुन्नाभैयाचे पात्र दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. दिव्येंदू शर्माने साकारलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीजनमध्ये मुन्नाभैयाच्या पात्राने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. पण, आता दिव्येंदू शर्मा मिर्झापूरमधून नाही; तर एका जाहिरातीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नुकतीच मुन्नाभैयाचे पात्र साकारलेल्या दिव्येंदू शर्माची नवीन जाहिरात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुपर स्प्लेंडर एक्सटेक या मोटरसायकलची ही जाहिरात असून, यातील संवादाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. ‘मिर्झापूर’मधील मुन्नाभाईच्या लूकमध्ये दिव्येंदू शर्मा गाडीवरून पेट्रोलपंपाकडे येताना दिसत आहे. तो येताना पाहून पेट्रोलपंपावरील कर्मचारी फुकटमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला, असे म्हणत त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरणार इतक्यात तो त्याला थांबवून गाडीच्या वैशिष्ट्यांविषयी सांगत आहे. शेवटी जे वाक्य दिव्येंदूने म्हटले आहे, त्याचा संबंध मिर्झापूर या वेब सीरिजबरोबर जोडला जात आहे. तो म्हणतो, “माझी जास्त आठवण काढू नकोस.”
‘मिर्झापूर सीजन ३’मध्ये कालिन भैय्या, गुड्डू पंडित, बीना त्रिपाठी, गोलू, माधुरी, शरद शुक्ला, भरत त्यागी ही पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत असली तरी प्रेक्षकांना या वेब सीरिजमध्ये मुन्नाभैयाची उणीव जाणवल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले होते. आता जाहिरातीतील शेवटचे वाक्य याच संबंधित नाही ना? असे म्हणत मुन्नाभैयाचे हे वाक्य जे चाहते अभिनेता वेब सीरिजमध्ये नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत आहेत, त्यांच्यासाठी असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
दरम्यान, ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीजननेदेखील प्रेक्षकांना वेड लावले आहे. दुसऱ्या सीजननंतर या वेब सीरिजचा तिसरा सीजन कधी पाहायला मिळणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली होती. आता ५ जुलै २०२४ ला अमेझॉन प्राइमवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. वेब सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचे चाहते कौतुक करताना दिसत आहेत. त्याबरोबरच रिचा चड्ढाने पती अली फजलच्या दमदार अभिनयाचे कौतुक करीत त्याची चाहती असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘मिर्झापूर ३’मध्ये मुन्नाभैयाचे पात्र दाखविण्यात आलेले नाही. आधीच्या दोन सीजनमध्ये धुमाकूळ घालणारा मुन्नाभैया यात नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.