निवडक भूमिकांमधूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या तरुण कलाकारांमध्ये गुलशन देवैय्या हे नाव नेहमी घेतलं जातं. ओटीटीवर विविध वेबमालिकांमधून तो सातत्याने प्रेक्षकांसमोर येतो आहे किंबहुना या माध्यमावरचा आश्वासक चेहरा म्हणून तो ओळखला जातो. गुलशन पुन्हा एकदा ‘बॅड कॉप’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. या मालिकेत तो पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या वेबमालिकेत दुहेरी भूमिका करायला मिळणार हे ऐकूनच त्यासाठी होकार दिला होता, असं गुलशनने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितलं.

आदित्य दत्ता दिग्दर्शित, अनुराग कश्यप, गुलशन देवय्या आणि हरलीन सेठी अभिनित ‘बॅड कॉप’ या वेब मालिकेत नव्वदच्या दशकातील कथानक दाखवण्यात आलं आहे. ‘बॅड कॉप’ ही वेब मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर २१ जून रोजी प्रदर्शित झाली असून त्याचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबमालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी बोलताना अर्जुन आणि करण या दोन भावांची कथा यात असल्याचं त्याने सांगितलं. करण हा पोलीस अधिकारी आहे. त्याची पत्नी देविकासुद्धा पोलीस आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. मात्र एका प्रकरणाचा माग घेत असताना करण गायब होतो आणि त्याची जागा मुळात गुंड असलेला त्याचा भाऊ अर्जुन घेतो. करणचं हरवणं, अर्जुनने त्याची जागा घेणं, काझबे या गँगस्टरशी त्याचा सामना होणं अशी कथेतली गुंतागुंत आणि रहस्य वाढत जातं, असं तो म्हणतो. दिग्दर्शक आदित्य दत्ता यांनी कथा सांगितल्यावरच मी होकार दिला होता. एकतर दुहेरी भूमिका, त्यातून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं हे आव्हान आणि आनंद दोन्हींचा अनुभव देणारं असल्याने ही मालिका स्वीकारल्याचं त्याने सांगितलं.

हेही वाचा >>> ‘अर्जुन रेड्डी’तील प्रितीला पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हुबेहूब आलिया भट्ट”

दुहेरी भूमिका साकारणं कोणत्याही कलाकारासाठी अवघडच असतं असं तो सांगतो. दुहेरी भूमिका करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टींचा अभ्यास जास्त करावा लागतो. एखादी व्यक्तिरेखा तुम्ही साकारता, तुमचे संवाद म्हणता तेव्हा दुसऱ्या व्यक्तिरेखेत वेगळा कलाकार तुम्हाला प्रतिसाद देत असतो. इथे दोन्ही बाजूने तुम्हीच असता. तुम्हालाच समोर अमूक व्यक्तिरेखा आहे अशी कल्पना करून दृश्य द्यायची असल्याने हा सारा प्रकार आव्हानात्मक असतो, असा अनुभव त्याने सांगितला.

या चित्रपटात त्याने पुन्हा एकदा दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर काम केलं आहे. अनुरागचे दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या चित्रपटात त्याने आधी काम केलं होतं. २००८ पासून मी त्यांना ओळखतो आहे. माझ्या आगामी ‘लिटिल थॉमस’ या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली आहे, पण आम्हाला वैयक्तिकरीत्या कधी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. आमच्या अधिकतर भेटी चित्रपटाच्या सेटवर व्हायच्या. माझ्या जवळच्या मैत्रिणीबरोबर त्यांचं लग्न झालं होतं, नंतर ते विभक्त झाल्यावर थोडा आमचा संपर्क कमी झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सेटवर खूप गप्पा मारल्या. एकमेकांची मस्करी केली. चित्रपट, राजकारण, अर्थकारण या विषयांवर आमच्या चर्चा व्हायच्या. माझ्यासाठी या सुंदर आठवणी आहेत, असं गुलशनने सांगितलं.

नव्याने अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या कलाकारांनी समर्पणाची तयारी ठेवूनच यायला हवं, असं तो म्हणतो. स्वत: विषयीच्या अवास्तव कल्पना, लगेच काम मिळेल आणि लगेच मोठे कलाकार होऊ हा फाजील विश्वास बाळगून या क्षेत्रात कधीच येऊ नये. खूप जास्त मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द ठेवूनच या क्षेत्रात यायला हवं, असं तो आग्रहाने सांगतो. इथे काम करताना तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असणंही तितकंच गरजेचं आहे, अपयशाला कसं सामोरं जायचं याचीही तयारी हवी म्हणजे भ्रमनिरास न होता, स्वत:ला त्रास करून न घेता काम करणं सोपं जातं, असंही त्याने सांगितलं.

‘बॅड कॉप’ या वेबमालिकेत अभिनेत्री हरलीन सेठीही मुख्य भूमिकेत आहे. ‘या क्षेत्रात आत्मकेंद्रित राहून आणि शांत राहून काम करणं गरजेचं आहे, असं हरलीन सांगते. एक दृश्य तुम्ही चांगलं दिलं किंवा तुमची एखादी भूमिका नावाजली गेली म्हणून स्वत:बद्दल अति विश्वास वाटता कामा नये. शिवाय, एखादं काम मिळालं-नाही मिळालं, कमी-अधिक झालं म्हणून मानसिक तणाव वाटत असेल तर त्यासाठी उत्तम गाणी ऐका, गाणी गा, मोठ्याने संवाद साधा, स्वत:च्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्या, असा सल्लाही तिने दिला.