काही वर्षांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’वर ‘लस्ट स्टोरीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट प्रचंड गाजला. तर त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्याने या चित्रपटावर टीका केली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता आजीच्या भूमिकेत दिसत असून त्या लैंगिक संबंधांबाबत खुलेपणाने चर्चा करताना दिसत आहेत. एखाद्या पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्यावर त्याच्याशीच लग्न केलं पाहिजे असं काही नाही असा सल्ला त्यात त्यांच्या चित्रपटातील नातीला देताना दिसत आहेत. आता यावर अभिनेता, निर्माता, चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके याने आक्षेप घेतला आहे.
त्याने ट्वीट करत लिहिलं, “नेटफ्लिक्स लस्ट स्टोरीज २! आजी म्हणते – ‘बेटा, जर तू एखाद्या मुलाबरोबर लैंगिक संबंध ठेवलेस तर याचा अर्थ असा नाही की तू त्याच्याशीच लग्न केल पाहिजे. तू कधीही आणि कोणाबरोबरही सेक्स करून एन्जॉय करू शकतेस.’ अनुराग ठाकूर सर, ही आपली संस्कृती आहे? जर नेटफ्लिक्स आणि रोनी स्क्रूवाला आपली संस्कृती खराब करत आहेत तर त्यांना थांबवणं ही तुमची जबाबदारी नाही?”
आता त्याचं हे ट्वीट खूप चर्चेत आलं असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या ट्वीटवर कमेंट करत अनेकांनी नीना गुप्ता आणि बॉलीवूडला ट्रोल केलं. तर अनेकांनी “बॉलीवूडकडून काही चांगली अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे” असं म्हणत या चित्रपटावर टीका केली आहे.