गेल्या काही वर्षांमध्ये ओटीटी हे एक लोकप्रिय माध्यम म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. ओटीटीवर विविध आशयांचे, विविध प्रकारचे कार्यक्रम, चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतात. अनेकदा ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांवर आक्षेप घेतला जातो. ओटीटीवर दाखवली जाणारी बोल्ड आणि भडक दृश्य लोकांना खटकतात. या भडक दृश्यांचा लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो असं अनेकदा म्हटलं जातं. आता याबाबत दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
आणखी वाचा : महेश मांजरेकरांच्या लेकाने त्याच्या आईसाठी केली खास पोस्ट; म्हणाला…
महेश मांजरेकर यांंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, “समाजात आपल्या आजूबाजूला जे काही घडतं तेच चित्रपट, वेब सीरिजमध्ये दाखवलं जातं. निर्माता म्हणून काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. पण, हेच प्रेक्षकांच्या बाबतीतही लागू होतं. आता प्रेक्षक पुरोगामी विचारांचे झाले आहेत. याचबरोबर जर आपल्याकडे एखाद्या व्यक्तीवर कलाकृती करायची असेल, तर त्या व्यक्तीचे थेट नाव घेता येत नाही. पण परदेशात हे आपण करू शकतो. जर आपल्याकडे हे शक्य झालं तर भन्नाट गोष्टी सांगितल्या जातील.”
पुढे ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचा बायोपिक करताना त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सकारात्मक बाजूबरोबरच त्याच्या आयुष्याची नकारात्मक बाजूसुद्धा दाखवली गेली पाहिजे. पण, सध्या घडत असणाऱ्या घटनांबद्दल बोललं तर त्या कोणीही ठरवून घडवत नाही.” महेश मांजरेकर यांचे हे बोलणं आता चर्चेत आलं आहे.