भारताने टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यासंदर्भातील पोस्टचा सोशल मीडियावर महापूर आला आहे. त्यातच हार्दिक पंड्याच्या विजयी कामगिरीचे लोक कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हार्दिक पंड्या तुम्हाला आठवतोय का? आयपीएलमधील कामगिरीनंतर ट्रोल होणारा हार्दिक पंड्या असा विचार तुम्ही करत असाल. पण नाही, आम्ही या हार्दिक पंड्याबद्दल बोलतच नाही आहोत. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा तो नाही तर कोणता हार्दिक?

आम्ही “वेलकम टू पीपल ऑफ बार्बाडोस अँड बरोडा” असं म्हणून आपल्या व्लॉगची सुरुवात करणाऱ्या हार्दिक पंड्याबद्दल बोलतोय. होय, द व्हायरल फिव्हर म्हणजेच टीव्हीएफ या युट्यूब चॅनेलवर हार्दिक पंड्यावर विडंबनात्मक व्लॉगमध्ये जो तरुण दिसतोय तो अनेकांना खरा हार्दिक वाटतो. तर त्या अभिनेत्याचं नाव प्रतिष मेहता आहे. समजा जर हा प्रतिष आणि ‘द कोटा फॅक्टरी’चा जितू भैय्या एकत्र आले तर?

हेही वाचा…‘टिप टिप बरसा पानी’मध्ये अक्षय कुमारला किस करायला तयार नव्हती रवीना टंडन; कारण ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “तुझ्या बाबांना…”

यावर तुम्ही म्हणाल, कुठे हार्दिक पंड्यापेक्षा जास्त खरा वाटणारा आणि प्रत्यक्ष हार्दिक आपल्यासमोर आहे असा अभिनय करणारा प्रतिष जो त्याच्या व्हिडिओमधून सतत हसवतो आणि कुठे कोटा फॅक्टरीचा जितू भैय्या, जो कोटा मध्ये असणाऱ्या प्रचंड स्पर्धात्मक वातावरणात आयआयटीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो व आयुष्याची फिलोसॉफी मुलांना शिकवतो. या दोघांचं एकत्र येण, तेही ‘कोटा फॅक्टरी’मध्ये कसं शक्य आहे? पण ही शक्यता सत्यात आली आहे.

नुकताच लोकप्रिय ‘द कोटा फॅक्टरी’ वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. ही सीरीज २०१९ मध्ये टीव्हीएफ या यूट्यूब चॅनलवर आणि नंतर नेटफ्लिक्सवर आली. राजस्थानमधील कोटा शहरात आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सारख्या प्रतिष्ठित भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी दरवर्षी अनेक विद्यार्थी येतात. ही सीरिज कोटाच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमधील स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांचा संघर्ष, दबाव आणि अनुभव यांची कथा मांडते. ही वैभव पांडे नावाच्या १६ वर्षांच्या मुलाभोवती ती फिरते, जो आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटा येथे जातो. तिथं असणारं निरुत्साही वातावरण, भरपूर स्पर्धा, त्यात वैभवचे असणारे मित्र मैत्रिणी, त्यांच्या मजा मस्ती, प्रेम यामुळे मीना, मीनल, वैभव, वर्तिका, उदय, शिवांगी ही पात्रं प्रचंड लोकप्रिय झाली. कोटाच्या नकारात्मक वातावरणात विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण असणारा जितू भैय्या, जो प्रवाहाविरुद्ध वेगळ्या पद्धतीने शिकवतो, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अडीअडचणींना धावून येतो, हे पात्र सुद्धा प्रचंड लोकप्रिय झालं. हे पात्र जितेंद्र कुमार याने साकारलं आहे.

हेही वाचा…“तुझा रंग घासून काढ”, म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर म्हणाली, “मला याची लाज…”

याच जितेंद्र कुमारसह ‘कोटा फॅक्टरी ३’ मध्ये असणाऱ्या सगळ्या कलाकारांना प्रतिष मेहताने विविध सीनसाठी सूचना दिल्या आहेत. कोटा फॅक्टरी एक आणि दोन या दोन्ही सीझनमध्ये कमालीची लोकप्रिय पात्रं, वास्तववादी कथा आणि चित्रण या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सर्व गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात वेब सीरिजचा दिग्दर्शक राघव सुब्बूचा सिंहाचा वाटा होता. मात्र नव्या सिझनच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोशल मीडियावर हार्दिक पंड्या म्हणून व्हायरल झालेला अभिनेता प्रतिषने आपल्या खांद्यावर घेतली.

प्रतिषला कशी मिळाली कोटा फॅक्टरीची जबाबदारी

प्रतिषने याआधी टीव्हीएफच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. कोटा फॅक्टरी ३ मध्ये काम मिळवण्याचा किस्सा त्याने ‘ओटीटी प्ले’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. “एके दिवशी राघवने मला फोन केला आणि म्हणाला, ‘तुला सीझन ३ चं दिग्दर्शन करायचं आहे का?’ कदाचित मी त्यांच्यासोबत केलेल्या एक-दोन शोमध्ये राघवला मी हे करू शकतो असं वाटलं असेल. राघव टीव्हीएफमध्ये नेहमीच वरिष्ठ राहिला आहे. म्हणून, मी जेव्हा ‘हाफ सीए’ आणि ‘एसके सर की क्लास’ चं दिग्दर्शन केलं, तेव्हा राघव हे शो पाहायचा व आवडला की नाही हे सांगायचा. यामुळे मला या संपूर्ण प्रक्रियेची थोडी माहिती झाली. मी नेहमीच कोटा फॅक्टरीचा चाहता आहे. पहिल्या दोन सीझनमध्ये मी छोट्या भूमिकेत होतो. सीझन १ मध्ये मी पडद्यामागे काम केलं आहे. तर सीझन २ मध्ये मी एक छोटासा कॅमिओ केला होता. त्यानंतर सीझन ३ मध्ये राघव सुब्बुने दिग्दर्शनाची जबाबदारी मला दिली,” असं प्रतिष म्हणाला.

हेही वाचा…भारतीय संघाचा विजयोत्सव पाहून शाहरुख खान झाला थक्क! विराट अन् रोहितचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

कमी वेळ आणि दबाव

कोटा फॅक्टरीच्या आधीच्या दोन्ही पर्वात काम केल्याने अनुभव असला तरी इतक्या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन पहिल्या दोन सीझनप्रमाणे दमदार पद्धतीने पुढे नेऊ शकेन का, हे मोठं आव्हान होतं असं प्रतिषने सांगितलं. “मी कोणत्याही कठीण गोष्टीकडे संधी म्हणून पाहतो. दडपण असतं, पण मी नेहमी त्याचा आनंद घेतो. कारण ही संपूर्ण प्रक्रिया कशी आहे मला जाणून घ्यायचं होतं, शिकायचं होतं. एखादी गोष्ट करताना त्यासाठी जे काही द्यायचं असेल ते शंभर टक्के द्यायचा माझा प्रयत्न असतो. कोटा फॅक्टरीने खूप काही शिकवलं. कधीकधी तुम्ही आठ महिन्यांत दोन वर्षे शिकता. कोटा फॅक्टरी सीझन ३ येण्याआधीही माझ्याकडे त्यासाठी फार कमी वेळ होता. माझा तयारीचा कालावधी खूपच कमी होता. पण या आठ महिन्यांत मला खूप काही शिकायला मिळाले,” असं प्रतिषने नमूद केलं.

हेही वाचा…“मला तुरुगांत टाकायला…”, समांथा रुथ प्रभुने सांगितला डॉक्टरांनी दिलेला धक्कादायक सल्ला, म्हणाली…

कोटा येथील विद्यार्थी जीवनाचे अस्सल चित्रण केल्याबद्दल या सीरिजला खूप लोकप्रियता मिळाली. अशाच अनुभवातून गेलेल्या अनेक प्रेक्षकांना ती आवडली आहे. नेटफ्लिक्सवर या वेब सीरिजचा तिसरा सीझन काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे.