‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळवून दिली. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. तिच्या उत्स्फूर्ततेचं नेहमीच कौतुक केलं जातं. तर आता नम्रता वेब सीरिज या माध्यमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करत नम्रता सर्वांच्या घराघरांत पोहोचली. टेलिव्हिजनबरोबरच ती अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्येही झळकली. एक कलाकार म्हणून ती नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तर आता लवकरच ती एका नवीन वेब सीरिजमध्ये हटके भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचं नाव आहे ‘गेमाडपंथी.’ नम्रताची ही पहिलीच वेब सीरिज असून या सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा : नम्रता संभेरावला लागले ऑस्करचे वेध, डॉल्बी थिएटरबाहेरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, “लवकरच…”
काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी’ने त्यांच्या संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘गेमाडपंथी’ या सीरिजची घोषणा केली होती. ही एक डार्क कॉमेडी सीरिज असल्याचं या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहेत. एक स्त्री काही लोकांशी मिळून एका व्यक्तीच्या अपहरणाचा डाव रचते, असे या सिराजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. तर याचबरोबर या सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्सही पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि अभिनेता प्रणव रावराणे यांनी या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री नम्रता संभेराव या सीरिजमध्ये एका हटके भूमिकेत दिसणार आहे.
या वेब सीरिजमध्ये नम्रता एका हैदराबादी स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे संपूर्ण सीरिजमध्ये तिच्या बोलण्याचा लहेजाही वेगळा असणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्येही नम्रताची झलक दिसते. त्या व्यक्तीचं अपहरण करण्याच्या डावामध्ये नम्रताही सहभागी झालेली दिसते. त्यामुळे आता या सीरिजमध्ये नक्की ती काय काय धमाल करताना दिसणार आणि अपहरणाचा त्यांचा प्लॅन यशस्वी होणार का, हे सीरिज पाहिल्यावरच स्पष्ट होईल.