सध्या रंगभूमी, चित्रपट, मालिका आणि हिंदी-मराठी वेबमालिका अशा चारही माध्यमांमध्ये मराठी कलाकारांची घोडदौड सुरू असलेली पाहायला मिळते आहे. वेबमालिकांमध्येही खूप वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून कलाकार प्रेक्षकांसमोर येत आहेत. मात्र केवळ वेबमालिकाच नव्हे तर सध्या चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका, नाटक ही सगळीच मनोरंजनाची माध्यमे भिन्न प्रकृतीची आणि वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेली आहेत, असं मत अभिनेत्री प्रिया बापट हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केलं. प्रियाची मुख्य भूमिका असलेली ‘रात जवान है’ ही वेबमालिका ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारताना चारही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या प्रियाने तिला जाणवलेली या माध्यमांची वैशिष्ट्यं सांगितली.

हल्ली वेबमालिकांमधून वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत, विशेषत: तरुण पिढीशी निगडित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर या वेबमालिकांमधून भाष्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘रात जवान है’चा विषयही असाच वेगळा आणि आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे प्रिया सांगते. लहानपणीपासून मैत्री असलेल्या तिघांची कथा या वेबमालिकेत आहे. दोन मैत्रिणी आणि एक मित्र हे तिघंही सध्या संसारात अडकले आहेत. एरव्हीही कामाच्या रगाड्यात अडकल्याने तिघांना वरचेवर भेटणं कठीण जातं आहे. त्यात हे तिघंही जेव्हा पालकांच्या भूमिकेत शिरतात तेव्हा या मैत्रीवरच विरामचिन्ह लागतं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीला हे तिघंही कसे सामोरे जातात? मुलांना सांभाळत पालक म्हणून आपलं कर्तव्य बजावणं आणि आपली घट्ट मैत्री सांभाळत स्वत:लाही जपून ठेवणं या दोन्हींचा समतोल ते कसे साधतात, हे या मालिकेतून पाहायला मिळणार असल्याची माहिती तिने दिली.

हेही वाचा >>> Manvat Murders Review : उत्कंठावर्धक थरारनाट्य

या मालिकेत प्रियाबरोबर अंजली आनंद आणि वरुण सोबती हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर ओटीटी माध्यमांवरचा लोकप्रिय चेहरा अशी ओळख असलेल्या अभिनेता सुमित व्यासने या वेबमालिकेचं दिग्दर्शन केलं आहे.

‘रात जवान है’ या वेबमालिकेतील तिन्ही व्यक्तिरेखा या वेगवेगळ्या स्वभावांच्या आहेत. बालपणीची मैत्री या तिघांनीही आजवर घट्ट जपली आहे. अगदी महाविद्यालयीन शिक्षण, ऐन तारुण्यातला काळ आणि मग लग्न झाल्यानंतरही त्यांची मैत्री टिकून राहिली आहे. पण आता मुलं झाल्यावर त्यांना एकमेकांसाठी आणि स्वत:साठी वेळ मिळणार का? हा वरवर साधा विषय वाटतो. पण या अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर ही वेबमालिका भाष्य करते, असं प्रियाने सांगितलं.

‘या वेबमालिकेत मी सुमन नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. आत्तापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या आहेत, त्या सगळ्याच बव्हंशी स्पष्टवक्त्या किंवा रोखठोक बोलणाऱ्या, ठाम भूमिका असलेल्या अशाच होत्या. सुमनची व्यक्तिरेखा मात्र या सगळ्या भूमिकांच्या पूर्णपणे विरुद्ध अशी भूमिका आहे. बऱ्यापैकी शांत असलेली आणि एखादी गोष्ट पटत नसेल तर ती सोडून द्यायची किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचं असा सुमनचा स्वभाव आहे’ असं आपल्या भूमिकेबद्दल प्रियाने सांगितलं.

दिग्दर्शकाची मदत झाली… सुमनची भूमिका ही आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याने ही भूमिका करताना दिग्दर्शक सुमित व्यासची खूप मदत झाल्याचं प्रिया सांगते. काही व्यक्ती अशा असतात, ज्या कधीच पूर्णपणे व्यक्त होत नाहीत. मात्र मोकळेपणाने व्यक्त झाल्या नाही तरी त्यांची काहीशी अर्धवट वाटेल अशी वा तुटक प्रतिक्रिया देण्याची पद्धत असते आणि त्या पद्धतीने त्यांचं व्यक्त होणं हे फार वेगळं आणि अर्थपूर्ण असतं. त्यामुळे जर भूमिका करताना तुला असं वाटलं की इथे तुझी प्रतिक्रिया काहीशी तुटक आहे तर ती तशीच राहू दे. तो भाग अभिनयातून पूर्ण करण्याचा वेगळा प्रयत्न करू नकोस, असा सल्ला मला सुमितने दिला होता. त्यामुळे सुमनचा पडद्यावरचा वावर कसा असेल हे लक्षात यायला मदत झाली, असं तिने सांगितलं. शिवाय, सुमित स्वत: उत्तम अभिनेता असल्याने दिग्दर्शन करताना त्याच्या या अनुभवाचा उपयोग करून घेता आला. त्याने आम्हाला तिघांनाही आमच्या व्यक्तिरेखा स्वत:च शोधून त्या आमच्या शैलीत विकसित करायचं स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे त्याने दिलेल्या या पात्रांबरोबर जुळवून घेणं सोपं गेलं, असंही प्रियाने सांगितलं.

चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण

नाटक, मालिका चित्रपट आणि वेबमालिका या चारही माध्यमांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत, पण या चारही माध्यमांमध्ये गोष्ट सांगण्याची जी भिन्न पद्धत आहे ती मला अधिक भावते, असं प्रिया म्हणते. ‘चित्रपटाची गोष्ट दोन तासांत मांडली जाते, तीच गोष्ट वेबमालिका करताना तीन तासांपेक्षा अधिक कालावधी मिळत असल्याने अजून खुलवून सांगता येते. छोट्या छोट्या पात्रांची कथाही प्रेक्षकांना वेबमालिकेत पाहायला मिळते. तर नाटक करताना त्याची गोष्ट आणि काही मुख्य पात्रांवरच अधिक भर द्यावा लागतो. नाटक हे थेट प्रेक्षकांबरोबर संवाद साधणारे माध्यम असल्याने त्यात गोष्ट खूप ताणता येत नाही. मालिकेमध्ये प्रत्येक भागानुसार त्यात भर पडते, त्यामुळे ती लांबवता येते. वेबमालिकेत मात्र जर प्रेक्षकांना पहिला किंवा दुसरा भाग आवडला नाही, तर तिसरा भाग पाहिला जात नाही, त्यामुळे खूप विचार करून वेबमालिका तयार केली जाते, हे या चारही माध्यमांचं वैशिष्ट्य आहे’ असं तिने सांगितलं.

…तरच पालकत्व स्वीकारा…

या वेबमालिकेत प्रियाने आईची भूमिका केली आहे. वैयक्तिक आयुष्यात बहीण आणि तिची मुलगी या दोघींमधलं नातं जवळून अनुभवलं असल्याचं ती म्हणते. ‘मुलीला सांभाळताना पूर्णपणे तिच्यात गुंतून जाऊन जगाचं भान विसरताना मी बहिणीला पाहिलेलं आहे. कधी कधी तिला बाहेर जायचं असल्याने तू तिला सांभाळशील का? अशी तिच्याकडून होणारी विचारणा, भाचीला सांभाळणं हे गोड अनुभव मी घेतले आहेत. घर, मुलं आणि काम हे सगळं अगदी व्यवस्थित सांभाळूनही ती स्वत:साठी वेळ काढते. त्यामुळे कित्येकदा मला तिचा हेवाही वाटतो. मला वाटतं फक्त बाळाला जन्म दिला म्हणजे तुमचं पालकत्व पूर्ण होत नाही. मुलांचं संगोपन करणं, शिक्षण देणं, ते स्वत:च्या पायावर उभे राहीपर्यंत किमान अठरा-वीस वर्षं त्यांना सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही या गोष्टीसाठी तयार असाल तर नक्कीच पालकत्व स्वीकारावं’, असं स्पष्ट मत प्रियाने मांडलं.