प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मराठीनंतर हिंदी मनोरंजन सृष्टीतदेखील तिने तिची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असते. आता तिने तिच्या निरोगी आरोग्याचं रहस्य सांगितलं आहे.
प्रिया सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे खूप चर्चेत आहे. या सिरीजचा पहिला सीझन चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर आज या सिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. काही दिवसांपासून या सिरीजच्या टीझर आणि ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यावर कमेंट करत अनेक चाहत्यांनी प्रियाला “तू चार वर्षांपूर्वी जशी दिसायची तशीच आताही दिसतेस,” असं म्हटलं. याचं गुपित आता प्रियाने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सांगितलं आहे.
या सिरीजच्या प्रमोशनच्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, अतुल कुलकर्णी, प्रिया बापट आणि इजाज खान यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी फिटनेसबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “मला व्यायाम करायला आवडतो आणि मी तो रोज न चुकता करते. स्किन एजिंग लवकर होईल अशा कुठल्याही सवयी मला नाहीत. मला बाहेरचं खाणं आवडत नाही आणि कोणीतरी मला एखादं डाएट फॉलो करायला सांगितलं आहे म्हणून नाही तर मला स्वतःला ते आवडत नाही. अगदीच जर कधी बाहेर जेवायला गेलो तर मी सूप, सॅलेड असंच काहीतरी खाते.”
हेही वाचा : “माकड दिसतोय…,” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेला सिद्धार्थ जाधवचं चोख उत्तर; म्हणाला…
पुढे ती म्हणाली, “त्यामुळे भरपूर पाणी पीणं, घरचं खाणं आणि वेळेवर खाणं हे मी फॉलो करत असते. पण मला असं वाटतं की काही गोष्टी या अनुवांशिकरित्या आपल्याला मिळतात आणि त्या टिकवून त्याचं सोनं करणं आपल्या हातात असतं जे मी करण्याचा प्रयत्न करते.”