अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही नेहमी तिच्या बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक लूकचे व्हिडीओ व फोटो व्हायरल होत असतात. सध्या ती ‘पौरषपुर २’ या वेब सीरिजमुळे अधिक चर्चेत आली आहे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर शर्लिन या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात परतत आहे. २८ जुलैला ‘पौरषपुर २’ ही सीरिज अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी शर्लिन हिनं इंडस्ट्रीमध्ये आलेल्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे.
अलीकडेच शर्लिन चोप्रानं सिद्धार्थ कन्ननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळेस अभिनेत्रीला सिद्धार्थनं असं विचारलं की, ‘तुझ्याबरोबर अशी कोणती गोष्ट घडली आहे?, जी कुठल्याही तरुण-तरुणीबरोबर होऊ नये, जे इंडस्ट्रीच्या बाहेर आहेत.’ यावर शर्लिन म्हणाली की, “कोणत्या मॉडेलला किंवा अभिनेत्रीला तडजोड करावी लागली नाही पाहिजे. तसेच ज्यामुळे त्यांचे मनोबल तुटेल, असाही प्रसंग त्यांच्यावर उद्भवू नये. उदाहरणार्थ, जसे की कोणीतरी म्हणेल, अरे तुझ्यात ती जादूच नाहीये.”
हे ऐकून सिद्धार्थ म्हणतो की, “तुलाही असं ऐकावं लागलं होतं का?” त्यावर अभिनेत्री म्हणते की, “हो, मी ती जादू असलेली गोष्ट शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अशा कोणत्या जादूच्या ते शोधात होते, हे माहित नाही. जर तुम्हाला जमतं नसेल, तर तुम्ही समोरच्याला थेट जा म्हणा. तुमच्या योग्यतेनुसार भूमिका असेल तर कळवतो. तुम्ही तुमचे फोटो ठेवून जा, असं सांगा. पण तसं होतंच नाही. ते तुमचं मनोबल तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात.”
“तू एकटी राहते का?, तुझं कोणी नाही का?, तुला अभिनेत्री व्हायचं आहे का? तुझी ब्रेस्ट खरी आहे का? की ब्रेस्टची सर्जरी केली आहेस? ब्रेस्टची साइज काय आहे? आम्ही हात लावू शकतो का?, असे प्रश्न थेट दिग्दर्शकांनी मला विचारले होते. तेव्हा मला असं वाटलं होतं की, सहज विचारतं असतील. पण तसं नाही. मी त्यांना बोलायचे, माझ्यात जे गुण आहेत त्याविषयी तुम्ही बोला. ब्रेस्टची साइज वगैरे बघून चित्रपटाचे तिकीट खरेदी करतात का?”
“एकेदिवशी मी असे प्रश्न ऐकून समोरच्या व्यक्तीला थेट विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? तर तो व्यक्ती म्हणाला, ‘हो पण आमचं ओपन रिलेशनशिप आहे. आम्ही जास्त बोलतं नाही.’ मी म्हंटलं तरीही तुम्हाला महिलेच्या शरीर रचनेबद्दल माहित असेलंच ना. मग कशाला असले प्रश्न विचारता,” असं स्पष्टच शर्लिन म्हणाली होती.