मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. ती ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ताजा खबर’ अशा अनेक वेब सिरीजमध्ये झळकली. तिच्या या सगळ्याच वेब सिरीज तुफान हिट झाल्या. ओटीटीमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. आता याबद्दल श्रियाने भाष्य केलं आहे.
श्रिया पिळगावकर ओटीटीवरील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ओटीटीने तिच्या करिअरला एक नवी दिशा दिली असं तिने नुकतंच सांगितलं. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या ओटीटीवरील प्रवासाबद्दल भाष्य केलं. त्यावेळी हे माध्यम कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी कसं वरदान ठरत आहे याबद्दलची तिची मतंही तिने व्यक्त केली.
आणखी वाचा : “सिनेसृष्टीत क्वचितच…” सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतची खास पोस्ट
ओटीटी माध्यमामुळे कलाकारांना राजा न मानता कॉन्टेन्टला राजा मानलं जात आहे याच्याशी तू सहमत आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर श्रिया म्हणाली, “मी याच्याशी सहमत आहे. कलाकार म्हणून ही तिच्या चांगली संधी आहे. त्याचप्रमाणे लेखकांना देखील त्यांचे लिखाण प्रेक्षकांसमोर आणण्याचा हक्क या माध्यमामुळे मिळाला आहे. यातून त्यांचं लिखाण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय ही आनंदाची बाब आहे. तसंच आज चांगल्या कॉन्टेन्टचं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. आजच्या काळात तुम्ही प्रेक्षकांना मूर्ख बनवू शकत नाही आणि ही एक चांगली गोष्ट आहे.”
पुढे ती म्हणाली, “असही अनेक वेळा घडतं की कलाकाराचं कास्टिंग हे त्याचं फॅन फॉलोईंग बघून केलं जातं. पण मी याची निंदा करत नाही कारण राजश्री देशपांडे, तिलोत्तमा शोमे यांसारख्या अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांचा हक्क मिळाला आहे, प्रेक्षकांनी त्यांचं खूप कौतुक केलं आहे. त्यांच्या करिअरचा आलेख हा सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. ओटीटी या माध्यमाने माझ्या करिअरला एक नवी दिशा दिली. हे माध्यम प्रगतशील आहे आणि इथे न घाबरता वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी खूप वाव आहे.” आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.