गेले अनेक दिवस अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेब सीरिजची सर्वत्र खूप चर्चा होती. अखेर ही वेब सीरिज १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ताली ही वेब सिरीज तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, त्यांच्या हक्कांसाठी उभ्या राहणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे.
या वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर यामध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्याबरोबरच सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव हे मराठमोळे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. आता सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे.
आणखी वाचा : सुश्मिता सेनची प्रमुख भूमिका, तर जावई सुव्रत तृतीयपंथीयाच्या भूमिकेत…; ‘ताली’ पाहून शुभांगी गोखले म्हणाल्या…
सुश्मिता म्हणाली, “मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप वेगळाच होता. ते सगळे खूप दर्जेदार कलाकार आहेत. आपण एखाद्या नाटकासाठी जशी तयारी करतो तशी तयारी ते प्रत्येक भूमिकेसाठी करतात. ते साकारत असलेली प्रत्येक भूमिका ते जगतात आणि हे त्यांचं स्किल आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते पण तितकंच दडपणही येत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं अजिबात सोपं नाही.”
पुढे ती म्हणाली, “मी मराठी भाषा शिकले. रवी जाधव यांनी मला ज या अक्षराचे वेगवेगळे प्रयोग आणि उच्चारण शिकवलं. मराठीत बोलण्यासाठी मी मराठी शिव्याही शिकले. पण मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कधीही न विसरता येण्यासारखा होता.” आता सुश्मिताचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.