मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे. या निमित्ताने तेजस्विनीने अनेक खुलासे केले आहेत.
तेजस्विनीची ‘अथांग’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. याच्या निर्मितीची जबाबदारी तेजस्विनीने घेतली आहे. ती यात कोणत्याही भूमिकेत दिसत नसली तरी या वेबसीरिजसाठी तिने पडद्यामागे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नुकतंच एका मुलाखतीत तेजस्विनीने मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट
“हिंदी सिनेसृष्टीत किंवा बॉलिवूडमध्ये गटबाजी आहे, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. पण मराठी सिनेसृष्टीतही कंपूशाही आणि गटबाजी हा प्रकार सुरु झाला आहे. गेल्या काही वर्षांत मी फक्त ठराविक लोकांबरोबरच काम करत आहे, अशी टीका माझ्यावर होते. तीच टीम, तेच कलाकार असं समीकरणच बनलं आहे. काही दिवसांपूर्वी मी फक्त संजय जाधव यांच्याबरोबरच काम करते अशा चर्चाही सुरु होत्या. पण दिग्दर्शकाला काही ठरलेल्या कलाकारांसोबत काम करणं सोपं जातं, असे ती म्हणाली.
मराठी सिनेसृष्टीतही गटबाजी दिसून येतेय का? यावर बोलताना तेजस्विनी म्हणाली की, “नागराज मंजुळेही आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की… असं काही नाही की फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे.”
आणखी वाचा : दुखापतीमुळे अमोल कोल्हे सक्तीच्या विश्रांतीवर, तेजस्विनी पंडितने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत
दरम्यान तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. नुकतंच तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.