गेल्या काही वर्षांमध्ये हेरगिरीवर आधारलेल्या चित्रपटांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते. ‘एक था टायगर’, ‘मद्रास कॅफे’, ‘हॉलिडे’, ‘बेबी’, ‘नाम शबाना’ अशा बऱ्याचशा चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अक्षय कुमारचे या शैलीतले चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. चित्रपटांप्रमाणेच वेब विश्वामध्येही हेरगिरी करणाऱ्या शूरवीर जवानांच्या कथा दाखवल्या जातात. मनोज वाजपेयी यांची ‘द फॅमिली मॅन’ही सीरिज याच शैलीमध्ये मोडते. या सीरिजचे दोन सीझन आले असून त्याचा तिसरा सीझन पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो असे म्हटले जात आहे.
अशाच धाटणीतली ‘मुखबीर’ ही वेब सीरिज लवकरच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचा फर्स्ट लूक असलेला फोटो नुकत्याच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या पोस्टमधल्या पहिल्या फोटोमध्ये आदिल हुसेन हातामध्ये एक कागद घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या अँगलने काढलेल्या खालच्या फोटोमध्ये त्या कागदावर ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे असे लिहिलेले दिसते. त्यांच्या समोर असलेल्या टेबलवर वेगवेगळे नकाशे, काही फोटोग्राफर्स आणि वह्यांची पाने आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये “ही घोषणा ऐकून आम्हाला खूप आनंद झाला”, असे लिहिलेले आहे.
‘मुखबीर’ या नावाचा अर्थ गुप्तहेर (हिंदीमध्ये जासूस) असा होतो. या सीरिजमध्ये भारतातील एका चाणाक्ष गुप्तहेराची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. सीमेवर जाऊन लढणाऱ्या जवानांबद्दलची माहिती मिळवणे शक्य असते. त्यांच्या शौर्याची गाथा लोकांपर्यंत पोहचू शकते. पण हेरगिरी करणाऱ्या सैनिकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. ते लपून राहून देशासाठी काम करत असतात. अशाच एका शूरवीर योद्धयाची किर्ती लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या सीरिजच्या टीमने केला आहे.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक, शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या सीरिजमध्ये आदिल हुसेन यांच्यासह दाक्षिणात्य स्टार प्रकाश राज दिसणार आहेत. ‘स्पेशल ऑप्स’ ही प्रसिद्ध सीरिजचे दिग्दर्शक शिवम नायर आणि जयप्रद देसाई यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. झैन खान दुर्रानी, बरखा बिश्त, झोया अफरोज, हर्ष छाया, सत्यदीप मिश्रा आणि करण ओबेरॉय हे कलाकार सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत.