२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला वरुण धवन आणि क्रिती सेनॉनचा ‘भेडिया’ चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित दिनेश विजनचा हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी याच्या आणि ‘विक्रम वेधा’ या दोन चित्रपटांच्या ओटीटी रिलीजबद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या.
आता ‘विक्रम वेधा’पाठोपाठ ‘भेडिया’ या चित्रपटाची सुद्धा ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. बरेच दिवस चाहते ओटीटी वर ‘भेडिया’ची वाट पाहत होते. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित व्हायला हवा होता, पण यासाठी तब्बल ६ महीने वाट पहावी लागली. याआधीही ‘भेडिया’ २१ एप्रिलला ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती.
अखेर ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वरुण धवन आणि क्रीती सेनॉनचा ‘भेडिया’ २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. जिओच्या या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखीनही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नवे चित्रपट, वेबसीरिज तसेच HBO आणि WB सारख्या मोठ्या हॉलिवूड बॅनरखालील चित्रपट आणि सीरिजसुद्धा आपल्याला याच प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत.
‘भेडिया’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ ४० कोटींचा गल्ला जमवू शकला. मात्र ज्यांना हा चित्रपट प्रचं आवडला ते प्रेक्षक आता ‘भेडिया २’ची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मीडिया रीपोर्टनुसार २०२५ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो.