बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘मिशन राणीगंज’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार याआधी ऑगस्टमध्ये आलेल्या ‘ओएमजी २’ मध्ये दिसला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता जे प्रेक्षक ‘ओह माय गॉड २’ चित्रपटगृहात पाहू शकले नाहीयेत ते आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.
लवकरच ‘ओएमजी २’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ‘ओएमजी २’ हा २०१२ च्या ‘ओह माय गॉड’ चा अधिकृत सिक्वेल आहे. गेल्या वेळी उमेश शुक्ला यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्याचा सिक्वेल अमित रायने दिग्दर्शित केला आहे. ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘ओएमजी २’ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
आणखी वाचा : “कुणालाही गुलाम म्हणून…” अनुराग कश्यपचं हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलचं विधान चर्चेत
आनंदाची गोष्ट म्हणजे आता ‘ओएमजी २’ हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. नुकतंच नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया हॅंडलवर याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. ‘ओएमजी २’ हा लैंगिक शिक्षण आणि हस्तमैथुनसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करणारा चित्रपट आहे.
याच्या विषयामुळे चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळायलाही अडचणी आल्या होत्या. प्रेक्षकांनी मात्र चित्रपट चांगलाच उचलून धरला. शिवाय ‘ओएमजी २’समोर सनी देओलचा ‘गदर २’सुद्धा प्रदर्शित झाला होता. एवढा बिग बजेट चित्रपट समोर असूनही ‘ओएमजी २’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम, गोविंद नामदेव यांच्यासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.