२०२२ हे वर्ष अक्षय कुमारसाठी फारसं चांगलं गेलं नाही. यावर्षी अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ यांसारखे काही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले. त्याचे अलिकडेच प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र सुपरफ्लॉप ठरले. सुपरफ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ आज प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रेक्षकांकडून या चित्रपटाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. तसाच या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांनी थंड प्रतिसाद दिला. पण आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा : अजय देवगणपेक्षा सिद्धार्थ मल्होत्रा ठरला सरस, ‘थँक गॉड’ चित्रपटातील अभिनयावर प्रेक्षक फिदा
या डिसेंबरच्या अखेरीस हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर प्रदर्शित केला जाईल असेही सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्यात अद्याप कोणताही करार निश्चित झालेला नाही. पण जर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही, तर हा चित्रपट दोन महिन्याच्या आधीच ओटीटीवर प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अक्षयच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत ‘राम सेतु’चे बुकिंग सर्वात कमी झाले आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या अहवालानुसार ‘राम सेतु’ची फक्त ३९००० तिकिटेच विकली गेली आहेत. अक्षयच्या पृथ्वीराजपेक्षाही या चित्रपटाची कमी तिकिटे विकली गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा : Video: दीपावलीच्या शुभ दिनी अक्षय कुमार देव भक्तीत तल्लीन; त्याच्या ऑफिसमधील पूजेचा व्हिडीओ पाहिलात का?
दरम्यान अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता ओटीटीवर हा चित्रपट कशी कामगिरी करेल हे पाहणे औत्सुक्याच असणार आहे.