‘OMG 2’ नंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात झळकला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळाला होता. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी प्रेक्षकांची मनं या चित्रपटाने जिंकली. या चित्रपटात अक्षयसह परिणीती चोप्राही मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.
आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चांगलाच कमी पडला होता. ५५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला त्याच्या बजेटएवढेही पैसे बॉक्स ऑफिसवर कमावता आलेले नाहीत. या चित्रपटाची एकूण कमाई ४५.६६ कोटीच्या आसपास होती.
आणखी वाचा : रणबीरच्या ‘अॅनिमल’ची विकली गेली दोन लाखांहून अधिक तिकिटे; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी
बरेच प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत होते, आता मात्र याबद्दल माहिती समोर आली आहे. १ डिसेंबरपासून ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
अक्षय कुमारचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील कोळशाच्या खाणीतील एका दुर्घटनेवर बेतलेला आहे. यात अक्षय कुमारने जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारली आहे. वास्तविक जीवनात, जसवंत सिंग यांना ६५ मजुरांचे प्राण वाचवल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांच्याकडून नागरी शौर्य पुरस्कार ‘सर्वोत्तम जीवन रक्षक पदक’ देण्यात आहे होते.