Mirzapur 3 Teaser Out: बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेसह जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज कधी भेटीस येतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यात निर्मात्यांनी एक युक्ती लढवली. अलीकडेच त्यांनी ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख थेट जाहीर न करताना एका फोटोमधून जाहीर करून ती प्रेक्षकांनाच शोधायला सांगितली. हा फोटो पाहून अनेकांनी सीरिज ७ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज लावला. पण हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला नाहीये. जुलै महिन्यातच ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकताच ‘मिर्झापूर ३’चा एक जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. “जंगल में भौकाल मचने वाला है!” असं कॅप्शन देत ‘मिर्झापूर’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमधून कालीन भैय्या गुड्डू पंडितचा बदला घेण्यासाठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. ५ जुलैला ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज ‘अॅमेझॉन प्राइम’वर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
‘मिर्झापूर ३’च्या या पहिल्या टीझरवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “भिडू आता मजा येणार”, “अखेर प्रतीक्षा संपली”, “अखेर तारीख प्रदर्शित झाली. किती वेळ वाट पाहायला लावली”, “मुन्ना भैया नाहीये का?”, “गुड्डू भैय्या रॉक”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. .
हेही वाचा – “पुनर्जन्म आहे का?”, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम अभिनेता आजीच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला, “पुन्हा ये…”
‘मिर्झापूर ३’मध्ये काय पाहायला मिळणार?
‘मिर्झापूर २’ वेब सीरिजच्या शेवटी गुड्डू पंडित (अली फजल) मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा)ला मारून मिर्झापूरच्या खुर्चीवर बसतो आणि कालीन भैय्याला सोडून देतो. आता ‘मिर्झापूर ३’मध्ये कालीन भैय्या आपल्या खुर्ची आणि लेकाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. त्यामुळे हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘मिर्झापूर ३’मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत.