All We Imagine As Light OTT Release Update : ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा २०२४ मध्ये जगभरात चर्चेत राहिलेला भारतीय चित्रपट आहे. बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गजांकडून व समीक्षकांकडून कौतुक झालेला आणि अनेक अवॉर्ड्स मिळवणारा हा चित्रपट अखेर प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे. हा चित्रपट कधी व कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊयात.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुंबईतील दोन मल्याळी परिचारिकांच्या एकमेकांशी जोडलेल्या आयुष्याची कथा सांगतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडियाने केले आहे. नोव्हेंबर महिन्यात मोजक्याच शहरांमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
कधी, कुठे पाहता येईल ऑल वी इमॅजिन ॲज लाइट?
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचा ओटीटी प्रिमियर जानेवारीमध्ये डिस्ने+ हॉटस्टारवर होणार आहे. शुक्रवारी, डिस्ने+ हॉटस्टारच्या अधिकृत हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली. त्यात म्हटलंय की ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट ३ जानेवारीपासून प्रसारित होईल. “फेस्टिव्हल डी कान ग्रां पी विजेता 2024 आणि 2 गोल्डन ग्लोब नॉमिनेशन मिळवणारा, पायल कपाडियाची उत्कृष्ट कलाकृती असलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ३ जानेवारीला डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होईल,” असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
ओटीटी रिलीजबद्दल बोलताना दिग्दर्शिका पायल कपाडिया म्हणाली, “ऑल वी इमॅजिन ॲज लाईटला तुमच्या सर्वांकडून मिळालेले प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आहे. थिएटरमध्ये यशस्वी झाल्यावर हा चित्रपट आता प्रेक्षकांना डिस्ने+ हॉटस्टारवर पाहता येईल, याचा मला आनंद आहे. आता हा चित्रपट मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याने मी खूप उत्सुक आहे.”
पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका ठरून पायल कपाडियाने इतिहास रचला. ‘ग्रां प्री’ हा कानमधील ‘पाम डोर’ पुरस्कारानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या सिनेमाला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या कॅटेगरीत व दिग्दर्शिका पायल कपाडियाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळालं आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला दिग्दर्शक ठरली आहे.
या चित्रपटात कनी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृधू हारून आणि अजीस नेदुमनगड हे कलाकार आहेत.