‘एल्विस ऑफ पंजाब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत गायक अमरसिंग चमकीला यांच्या जीवनावर आधारित ‘चमकीला’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ते अवघ्या २७ वर्षांचे असताना त्यांच्यावर पंजाबमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. चमकीला त्यांची पत्नी अमरजोतसह मेहसमपूर शहरात कार्यक्रमासाठी गेले होते, तेव्हा अचानक चेहरा झाकून पोहोचलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या संपूर्ण घटनेवर चमकीला यांची पहिली पत्नी गुरमेल कौर यांनी एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपटात एकही संवाद नसलेल्या गुरमेल यांनी पतीच्या निधानाच्या दोन दिवसाआधीच आपली त्यांच्याशी भेट झाली होती आणि काहीतरी वाईट घडणार याचा आपल्याला अंदाज होता, असं सांगितलं. ‘सिने पंजाबी’ला दिलेल्या गुरमेल यांनी चमकीला व अमरजोत यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांची भेट घेतली होती. त्या दिवशी घडलेला प्रसंग आठवत त्या म्हणाल्या, “मी चपात्या लाटत होते आणि अमरजोत भाजी चिरत होती तेव्हा मला एक वाईट भास झाला. मी त्याबद्दल माझ्या सासऱ्यांना सांगितलं आणि त्यांनाही असंच वाटतं का, ते विचारलं पण ते काहीच बोलले नाहीत. अमरजोतलाही वाटलं काहीतरी गडबड आहे आणि तिने मला विचारलं पण मी तिला काहीच सांगितलं नाही.”
चमकीला यांच्या मृत्यूनंतर आर्थिक संकट आलं, असं गुरमेल यांनी सांगितलं. “माझ्या आयुष्यातील हा खूप कठीण काळ होता. त्यांच्या निधनानंतर मी रोजंदारीवर काम केलं. मला दिवसाला पाच रुपये मिळायचे,” असं त्या म्हणाल्या. तुमचं कुटुंब आर्थिक अडचणीत असताना चमकीला यांच्या चाहत्यांनी किंवा इतर कोणी मदत केली का, असं विचाल्यावर गुरमेल यांनी नकार दिला.
“मला त्यांचा खूप अभिमान होता. ते इतके लोकप्रिय होते की मला काळजी करण्याची काहीच गरज नव्हती. मी कधी त्यांचे कार्यक्रम पाहिले नाही. त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण माझ्या व माझ्या मुलींच्या सर्व जबाबदाऱ्या उचलल्या. त्यांनी मला आर्थिक मदत केली व माझ्यासाठी जमीनही विकत घेतली होती,” असं गुरमेल म्हणाल्या. गुरमेल व चमकीला यांना दोन मुली होत्या, त्या दोन्ही मुलींची लग्नं झाली आहेत.