Amazon Prime Video Rules : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ भारतात २०२५ पासून पासवर्ड शेअरिंगसाठी नवीन नियम लागू करणार आहे, ज्यामध्ये एका खात्यातून डिव्हाईसेसवर लॉगिन करता येण्याच्या मर्यादा येणार आहेत. अशी माहिती ‘मिंट’च्या अहवालात देण्यात आली आहे.
“तुमच्या प्राइम मेंबरशिपचा एक भाग म्हणून, तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य पाच डिव्हाईसपर्यंत प्राइम व्हिडिओचा आनंद घेऊ शकता,” असे अॅमेझॉन प्राइम सदस्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. “जानेवारी २०२५ पासून, आम्ही भारतात नवीन वापर अटी लागू करत आहोत, ज्यामध्ये पाच डिव्हाईसच्या मर्यादेमध्ये दोन टीव्हीचा समावेश असेल.”
हेही वाचा…बहुप्रतीक्षित Squid Game 2 वेब सीरिजसाठी तयार व्हा; कधी, कुठे प्रदर्शित होणार? जाणून घ्या…
“तुम्ही तुमच्या सेटिंग्ज पेजवरून डिव्हाईसेस मॅनेज करू शकता किंवा अधिक डिव्हाईसेसवर प्राइम व्हिडीओ पाहण्यासाठी आणखी एक प्राइम मेंबरशिप खरेदी करू शकता,” असे कंपनीने सांगितले.
सध्या अॅमेझॉन प्राइम सदस्य एका खात्यातून १० डिव्हाईसेसवर लॉगिन करू शकतात. नवीन नियमांनुसार, पाच डिव्हाईसेसवर लॉगिन करता येणे शक्य असेल, पण फक्त दोन टीव्हीवर लॉगिन करण्याची मर्यादा काही सदस्यांसाठी अडचणीची ठरू शकते.
अॅमेझॉनने असेही सांगितले आहे की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ” इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत कमी जाहिराती” असतील. त्याशिवाय, भारतात लवकरच जाहिरात-मुक्त प्राइम टियर सुरू होणार असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
भारतातील सध्याचे अॅमेझॉन प्राइम सदस्यत्वाचे पर्याय
सध्या अॅमेझॉन प्राइमचे वार्षिक पॅकेज १,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे, यामध्ये प्राइम व्हिडिओ, अॅमेझॉन शॉपिंग अॅपचे मोफत डिलिव्हरी आणि इतर फायदे मिळतात. तिमाही सदस्यत्वासाठी ५९९ रुपये आणि मासिक सदस्यत्वासाठी २९९ रुपये शुल्क आहे. याशिवाय, ७९९ रुपये किमतीचा प्राइम लाईट प्लॅन आणि ३९९ रुपये प्राइम शॉपिंग एडिशन प्लॅनही उपलब्ध आहे.