अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’मधील ‘द मिरर’ या लघुपटात ती झळकली होती. कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित या लघुपटात अमृताने घरकाम करणाऱ्या सीमा या महिलेची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या सीमा या पात्राचं सर्वत्र कौतुक झालं आणि यामुळेच यंदाच्या नेटफ्लिक्स राउंडटेबलसाठी अमृताला निमंत्रित करण्यात आलं होतं.
नेटफ्लिक्स राउंडटेबलमध्ये अमृता सुभाषसह यावेळी काजोल, जयदीप अहलावत, करीना कपूर खान, तिलोत्तमा शोम, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सान्या मल्होत्रा असे बडे कलाकार सहभागी झाले होते. या संवादसत्रात अमृताने ‘द मिरर’ या लघुपटाबाबत अनेक खुलासे केले. यामध्ये तिलोत्तमा शोम व अमृतासह अभिनेते श्रीकांत यादव प्रमुख भूमिकेत झळकले होते. ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणारे श्रीकांत-अमृता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या राउंडटेबलमध्ये अभिनेत्रीने एकंदर सीरिजच्या अनुभवाबद्दल सांगितलं.
‘द मिरर’ या लघुपटात अमृता सुभाष व श्रीकांतचे काही इंटिमेट सीन्स आहेत. अनेक वर्ष एकमेकांचे चांगले मित्र तसेच दोघांची कौटुंबिक ओळख असल्याने दोघंही सीन्स वाचून फार अस्वस्थ होते. त्यामुळे या दोघांनाही दिग्दर्शक कोंकणा शर्माने विचार करण्यास पुरेसा वेळ दिला होता.
‘द मिरर’ लघुपटाबद्दल सांगताना अमृता म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा यातील इंटिमेट सीन वाचून मी खरंच घाबरले होते. स्क्रिप्ट वाचल्यावर मी कोकोला (कोंकणा सेन शर्मा) सांगितलं की, मला श्रीकांतशी बोलायला एक दिवस दे कारण, अनेक वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एवढंच नव्हे तर तो माझ्या नवऱ्याचा देखील खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे मला सर्वात आधी त्याच्याशी बोलावं लागेल. ज्यावेळी मी याबद्दल श्रीकांतशी बोलले तेव्हा तो अजिबात तयार नव्हता.”
“तुझ्याबरोबर असे सीन्स मी करू शकत नाही असं श्रीकांतचं ठामपणे म्हणणं होतं. पण, त्यावेळी माझा नवरा संदेश कुलकर्णी जो स्वत: एक उत्तम अभिनेता आणि श्रीकांतचा खूप चांगला मित्र आहे. त्याने आम्हा दोघांना समजावलं. तू एकदम उत्तम काम करशील असं सांगत माझ्या नवऱ्याने श्रीकांतला धीर दिला अन् तो तयार झाला. ‘लस्ट स्टोरीज २’ प्रदर्शित झाल्यावर माझ्या नवऱ्याची भूमिका कोणी साकारली याबद्दल मला अनेकांनी मेसेज करून विचारलं होतं. एकंदर सर्वांनी श्रीकांतच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं.” असं अमृता सुभाषने सांगितलं
दरम्यान, अमृता सुभाषच्या कामाबद्दल सांगायचं, झालं तर ‘लस्ट स्टोरीज २’आधी तिने ‘देव’, ‘रमन राघव २.०’, ‘गली बॉल’, ‘धमाका’ अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. आजवर अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर अवार्ड आणि एक फिल्मफेअर ओटीटी अवार्डने सन्मानित करण्यात आलं आहे.