मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष सध्या कोंकणा सेन शर्मा दिग्दर्शित ‘लस्ट स्टोरीज २’ मुळे चर्चेत आहे. लस्ट स्टोरीजमधील कोंकणाने दिग्दर्शित केलेल्या ‘द मिरर’ लघुपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अमृताने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने अनेक सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीच्या ‘सेक्रेड गेम्स २’ मधील भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. ‘सेक्रेड गेम्स २’ मध्ये केलेल्या पहिल्या इंटिमेट सीनबाबत अमृताने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
हेही वाचा : “…अन् अमिताभ बच्चन यांनी माझ्यासमोर हात जोडले”, दिग्गज अभिनेत्याने सांगितला घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाले…
अमृता सुभाषने नुकतेच चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या सीरिजमधील तिच्या पहिल्या इंटिमेट सीनचे शूट करताना तिला कसा अनुभव आला याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “‘सेक्रेड गेम्स २’ या सीरिजचे शूटिंग करताना मला दिग्दर्शकाच्या टीमने माझ्या मासिक पाळीच्या तारखा विचारल्या, पाळीच्या वेळी महिलांना त्रास होतो, सहज शूट करता यावे यासाठी त्यांनी माझ्याकडे चौकशी केली होती.”
हेही वाचा : “माझ्या कुटुंबावर टीका करून काय मिळतं?” ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह कमेंट्स पाहिल्यावर करण जोहर भडकला, म्हणाला…
अमृता सुभाषने पुढे सांगितले, “‘सेक्रेड गेम्स २’ या सीरिजसाठी मी माझ्या पहिल्या इंटिमेट सीनचे शूट केले. या सीरिजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. त्यांनी पूर्णपणे माझ्या सोयीनुसार शूट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या टीमकडून मी अस्वस्थ होऊ नये याची काळजी घेण्यात आली, मला आधीच मासिक पाळीच्या तारखा विचारून घेतल्या होत्या आणि त्या तारखेच्या आसपास आम्ही शूटिंग करणार नाही असे कळवले होते. मला ही गोष्ट प्रचंड आवडली अनुराग कश्यप यांची संपूर्ण टीम फारच चांगली आहे.”
हेही वाचा : “भविष्यात नीना गुप्तांबरोबर पडद्यावर रोमान्स…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान, अमृता सुभाषने ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये रॉ एजंटची भूमिका साकारली होती. ‘सेक्रेड गेम्स’ च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने गणेश गायतोंडे ही प्रमुख भूमिका साकारली असून सीरिजचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे.