बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात. सध्या अनुराग त्याच्या आगामी ‘केनडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. अनुराग बऱ्याचदा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत असतो.
‘तांडव’ वेबसीरिजमुळे निर्माण झालेल्या कॉंट्रोवर्सीमुळे बरेच प्रोजेक्ट हे बंद पडले किंवा त्यात बदल करावे लागले. त्यापैकीच एक प्रोजेक्ट होता अनुराग कश्यपचा ‘मॅक्सिमम सिटी’ ही नेटफ्लिक्सची वेब सीरिज. ‘तांडव’मुळे निर्माण झालेला तणाव आणि एकूणच राजकीय वातावरणातील बदल यामुळे नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. नुकतंच अनुरागने त्याच्या या प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : २०२३ चा सर्वात मोठा चित्रपट ‘ओपनहायमर’ OTT वर; ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार पण…
‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुरागने या पप्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. नेटफ्लिक्सने स्वतःहून यातून बाहेर पडायचा निर्णय घेतल्याने अनुराग तेव्हा चांगलाच अस्वस्थ झाला होता. ही एक प्रकारची अदृश्य सेन्सॉरशिप होती असंच त्याचं मत तयार झालं होतं. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी ‘मॅक्सिमम सिटी’ इतकं महत्त्वाचं आणि इमानदार कलाकृती दुसरी केलेली नाही. ती माझी सर्वोत्तम कलाकृती होती.” याबरोबरच नेटफ्लिक्सने यातून काढता पाय घेतल्याने अनुरागला याचा खूप त्रास झाला.
यावेळी अनुराग फार डिप्रेशनमध्ये गेला तसेच यादरम्यान त्याला दारूचं व्यसन लागल्याचंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. याबरोबरच याचवेळी अनुरागला दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचंही त्याने कबूल केलं. अनुराग म्हणाला, “या प्रोजेक्टसाठी मी माझं सर्वस्व झोकून दिलं होतं, अन् तो प्रोजेक्ट बंद झाल्याने मी दुखावलो, मी पूर्णपणे वेडापिसा झालो होतो.” अनुरागच्या ‘केनडी’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात सनी लिओनी व राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.