करोनानंतर अनेक लोकांनी चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट बघणं कमी केलं असून, ते ओटीटीवर अधिक सक्रिय झाले आहेत. चित्रपट आणि वेब सीरिज तिथेच पाहणं त्यांना अधिक सोईचं वाटतं. त्यामुळेच मोठमोठे कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत. मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित केले जातात आणि त्यामुळे प्रेक्षकांना घरीच त्याचा आनंद घेता येतो. फक्त चित्रपटच नव्हे, तर वेब सीरिजही अनेक लोक मोठ्या प्रमाणात पाहतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही अशा वेब सीरिजची माहिती देणार आहोत, ज्या तुम्ही ओटीटीवर विनामूल्य पाहू शकता.
ढिंढोरा
लोकप्रिय यूट्यूबर भुवन बामची ‘ढिंढोरा’ वेब सीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही भुवनची पहिली वेब सीरिज होती आणि त्याला या सीरिजद्वारे चाहत्यांचं खूप प्रेम मिळालं. जर तुम्ही भुवनचे फॅन असाल आणि त्याच्या व्हिडीओज किंवा सीरिज पाहणं तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही ही सीरिज यूट्यूबवर मोफत पाहू शकता. यूट्यूबर भुवन बाम लवकरच या सीरिजचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. पहिल्या सीझनमध्ये भुवनने अनेक वेगवेगळी पात्रं साकारली होती.
हेही वाचा…‘OTT क्वीन’ श्रिया पिळगावकरला ‘या’ दिग्दर्शकाबरोबर करायचंय काम, म्हणाली, “आतापर्यंत मी…”
ऑपरेशन एमबीबीएस
‘ऑपरेशन एमबीबीएस’ ही वेब सीरिज एमबीबीएस या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे. आयुष मेहरा, अंशुल चौहान व सारा हाशमी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. एमबीबीएसची डिग्री मिळवणं किती व का कठीण आहे याचा अंदाज प्रेक्षकांना ही सीरिज पाहून येऊ शकतो. या सीरिजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची संघर्षमय कहाणी दाखवली आहे. ही सीरिज तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
एनसीआर डेज
‘एनसीआर डेज’ ही वेब सीरिज एका छोट्या शहरातील मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे, जो एमबीएची तयारी करण्यासाठी एनसीआरमध्ये येतो. त्यात एक सुंदर प्रेमकहाणीही दाखवली आहे. या वेब सीरिजमध्ये अंबरीश वर्मा आणि हीर कौर मुख्य भूमिकांत आहेत. ही सीरिजदेखील तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
कॅम्पस डायरीज
‘कॅम्पस डायरीज’ ही एक कॉमेडी ड्रामा वेब सीरिज आहे, ज्यामध्ये सहा जिगरी मित्रांची गोष्ट दाखवली आहे. या सीरिजमध्ये त्यांच्या वाढत्या वयातील विविध पैलूंचं चित्रण करण्यात आलं आहे. इथे एकीकडे प्रेमकथा पाहायला मिळते; तर दुसरीकडे हृदयद्रावक प्रसंगदेखील दिसतात. ही सीरिज एमएक्स प्लेअरवर मोफत उपलब्ध आहे.
अॅस्पिरेंट्स
‘अॅस्पिरेंट्स’ सीरिजमध्ये IAS परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा दाखवली आहे. यातील संदीप भैया या पात्राने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. अभ्यासाबरोबरच या सीरिजमध्ये प्रेम, दु:ख, मैत्री अशा अनेक भावनांचा समावेश आहे. ही लोकप्रिय वेब सीरिज तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.