या वीकेंडला ओटीटीवर नवे सिनेमे प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. अजय देवगणचा २ ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘औरों में कहां दम था’ हा सिनेमा या वीकेंडला म्हणजेच २७ सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. तसेच, जान्हवी कपूरचा २ ऑगस्टलाच प्रदर्शित झालेला ‘उलझ’ सिनेमादेखील २७ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित झालेले हे दोन्ही सिनेमे ओटीटी माध्यमावरही एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर सिनेमागृहात कमाईचे नवे विक्रम करणारा ‘स्त्री २’सुद्धा याच तारखेला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

‘औरों में कहां दम था’ व ‘उलझ’ हे दोन्ही सिनेमे २७ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, ‘सिनेमारेअर’ या एक्स अकाउंटवर या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अजय देवगणचा ‘औरों में कहां दम था’ हा सिनेमा २७ तारखेला प्राइम व्हिडीओवर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ‘उलझ’ हा सिनेमा २७ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हेही वाचा…प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन युट्यूब चॅनल हॅक, सर्व व्हिडीओ डिलीट, करिअर संपलं? पोस्ट चर्चेत

‘उलझ’ व ‘औरों में कहां दम था’ची सिनेमागृहांतील कामगिरी

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग पोर्टल सॅकनिल्कनुसार, २ ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘उलझ’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात केवळ ११.२५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता, असे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधांशु सारिया यांनी केले आहे.

तसेच, अजय देवगण आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला नीरज पांडे यांचा ‘औरों में कहां दम था’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने केवळ १२.९१ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा…सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर काय पाहायचं? वाचा सिनेमा अन् वेब सीरिजची यादी

दरम्यान, थिएटरमध्ये यशस्वीपणे सुरू असलेल्या अमर कौशिक यांच्या ‘स्त्री २’ने स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाल्यापासून जगभरात तब्बल ८२५ कोटी रुपये कमावले आहेत. या सिनेमात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना व पंकज त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. मॅडॉक फिल्म्सनुसार, या हॉरर कॉमेडीने आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट होण्याचा मान मिळविला आहे.