नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स हे सध्या एकत्र वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. भारतीय कथा जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी या दोघांनी एकत्र येऊन भागीदारीमध्ये काम करायचे ठरवले आहे. यापैकी ‘द रेल्वे मेन’ हा पहिला प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या नव्या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचे सुपुत्र शिव रवैल या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे.
चार भागांची ही मिनी सीरिज एका सत्य घटनेवर बेतलेली आहे. ‘द रेल्वे मेन’ची कथा जगातील सर्वात भयंकर अशा भोपाल ट्रॅजडीवर आधारित आहे. या ट्रॅजडीमधील अज्ञात लोकांच्या शौर्याची गोष्ट या सीरिजमधून दाखवण्यात येणार आहे. १९८४ मध्ये झालेल्या या घटनेच्या आजही कित्येक कटू आठवणी लोकांच्या मनात आहेत.
आणखी वाचा : लाईव्ह शोमध्ये चाहत्याने पैसे उधळले अन् आतिफ अस्लमने कार्यक्रम थांबवला; गायक म्हणाला, “मित्रा…”
भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती, ज्यामुळे १५ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेवर याआधीही चित्रपट बनले आहेत, पण या सीरिजमधून बऱ्याच नव्या गोष्टी समोर येणार आहेत. एका शहरात अडकलेल्या शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी कर्तव्याच्या पलीकडे गेलेल्या भारतीय रेल्वे कर्मचार्यांची व अज्ञात वीरांची हृदयस्पर्शी कथा या सीरिजमधून समोर येणार आहे.
‘द रेल्वे मेन’ची निर्मिती YRF एंटरटेनमेंटने केली असून त्याची कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे. शिव रवैल यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘द रेल्वे मेन’ मध्ये आर माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खानसारखे मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. १८ नोव्हेंबरपासून ही सीरिज जगभरात सर्वत्र नेटफ्लिक्सच्या माध्यमातून पाहता येणार आहे.