Best Crime Thriller Movie on OTT: एकीकडे बॉलीवूड चित्रपट चालत नसल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपट मात्र उत्तरेकडील राज्यांमध्येही दमदार कमाई करताना दिसत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या चित्रपटांमधील अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. तुम्हालाही दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका.

आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्या आयएमडीबीवर खूप चांगले रेटिंग मिळाले आहे. चित्रपटातील ट्विस्ट बघून तुम्ही थक्क व्हाल. चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. चित्रपट जवळपास तीन तासांचा आहे, पण तो पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही.

काय आहे या दाक्षिणात्य चित्रपटाचे नाव?

करोना काळापासून लोक थिएटरपेक्षा घरी बसून ओटीटीवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा आवडता जॉनर थ्रिलर आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या चित्रपटाबद्दल सांगतोय, तोही एक थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘रतसासन’ (Ratsasan). या चित्रपटात विष्णू विशाल, अमला पॉल आणि सरवणन मुख्य भूमिकेत आहेत तर काली वेंकट, विनोदिनी वैद्यनाथन आणि रामदास सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट राम कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

हा चित्रपट दोन तास ५० मिनिटांचा आहे. तुम्ही वीकेंडला हा चित्रपट आरामात पाहू शकता. ‘रतसासन’ हा एका सीरियल किलरवर आधारित सिनेमा आहे. एक माणूस तरुण मुलींचे अपहरण करून त्यांचे निघृण खून करतो. अपहरण व खुनाच्या घटना वाढू लागल्यावर पोलीस तपास करू लागतात आणि या सीरियल किलरचा शोध घेतात.

हे प्रकरण इन्स्पेक्टर अरुण यांना सोपवलं जातात, ज्याला चित्रपट निर्माता व्हायचं होतं पण वडिलांच्या निधनानंतर तो पोलीस होतो. चित्रपटाची कथा ऐकायला साधी वाटत असली तरी चित्रपट मात्र ट्विस्टनी भरलेला आहे. या चित्रपटात तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर, क्राइम सगळं पाहायला मिळेल. तुम्हाला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे ‘रतसासन’ चित्रपट?

आता हा ‘रतसासन’ चित्रपट ओटीटीवर कुठे पाहता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा चित्रपट तुम्हाला एक नाही तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. सर्वात आधी तुम्ही तो जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. तसेच ‘रतसासन’ प्राइम व्हिडिओवर देखील उपलब्ध आहे. चित्रपटाला IMDb वर ८.३ रेटिंग मिळाले आहे.