Bigg Boss 17 : बिग बॉसच्या सतराव्या सिझनची चांगलीच क्रेझ चाहत्यांमध्ये पाहण्यास मिळते आहे. या घरात सदस्यांनी एकमेकांना मारण्यासाठी खुर्च्या उचलल्या होत्या. हे सगळं प्रकरण ताजं असतानाच नवे प्रोमो आणि जिग्ना व्होरा हे नाव चर्चेत आलं आहे. कारण जिग्ना व्होरा यांची पत्रकार परिषद बिग बॉसच्या घरात रंगणार आहे. जिग्ना व्होरा यांना पत्रकार विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यांना जिग्ना व्होरा यांनी उत्तरं दिली आहेत.
जिग्ना व्होरा यांची बेधडक उत्तरं
बिग बॉसच्या सिझनमध्ये एखादी पत्रकार परिषद होणं हे पहिल्यांदाच पाहण्यास मिळतं आहे. जो प्रोमो आला आहे त्यात एक पत्रकार जिग्ना व्होरांना विचारतो, तुमचा दिग्गज लोकांशी जो संपर्क आला त्यामुळेच तुम्ही अडचणींत अडकलात का? त्यावर जिग्ना व्होरा म्हणतात, हाय प्रोफाईल कॉन्टॅक्ट्स कुणाचे नसतात? तुमचे नाहीत का?
मुलगा तुरुंगात असताना भेटायला आला आणि…
यानंतर एक पत्रकार म्हणतो मी तुम्ही लिहिलेलं पुस्तक वाचलं आहे. त्यात तुम्ही खुलासे केले आहेत. पण तुरुंगातला कोणता प्रसंग होता जो तुम्हाला लक्षात राहिला आहे? त्यावर जिग्ना व्होरा म्हणतात, “माझा मुलगा मला भेटायला तुरुंगात आला होता. त्याने मला सांगितलं आई तुझ्यावर जे आरोप होत आहेत त्यात तथ्य नाही. तू अशी नाहीस हे मला माहित आहे. माझ्या मुलाचं हे बोलणं ऐकून मी मनाशी निश्चय केला की आता मला कुणापुढेच काहीही सिद्ध करायचं नाही. मात्र त्यावेळी माझ्या कुटुंबाला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. माझे आजोबा तेव्हा ९० वर्षांचे होते. मला कपडे देण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी आले होते. ते परतत होते तेव्हा एका प्रतिथयश पत्रकाराने त्यांचा चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ काढला. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली.” असंही जिग्ना व्होरा यांनी सांगितलं. तसंच एका संपादकाने माझ्याविषयी काय पसरवलं होतं हे देखील त्या सांगताना दिसत आहेत ज्यावेळी घरातल्या सदस्यांच्या डोळ्यातही पाणी आलेलं दिसतं आहे.
जिग्ना व्होरा कोण आहेत?
बिग बॉस १७ च्या सिझनमध्ये आलेल्या जिग्ना व्होरा या मुंबईतल्या एकेकाळच्या बेस्ट क्राईम रिपोर्टर्स पैकी एक होत्या. २००४ पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्या नंतर खूप मोठ्या पदावर पोहचल्या होत्या. २०११ मध्ये जिग्ना व्होरा यांचं नाव पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ज्यानंतर त्यांना तुरुंगातही जावं लागलं. शेवटी २०१८ मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली. डॉन छोटा राजनने केलेल्या एका कॉलमुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं. तसंच त्यांच्या आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. त्यांनी एक पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकावर आधारित असलेली वेब सीरिज स्कूप ही देखील खूप गाजली. हंसल मेहता यांनी त्याचं दिग्दर्शन केलं. आता बिग बॉसच्या घरात जिग्ना व्होरा पत्रकारांच्या प्रश्नांना काय काय उत्तरं देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे प्रोमो आलेत त्यांची खूप चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे.