Manisha Rani Buys Her First Home In Mumbai : ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या मनीषा रानीने आपल्या अनोख्या अंदाजाने हिंदी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर मनीषा ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वात पाहायला मिळाली. तिनं आपल्या जबरदस्त डान्सनं ‘झलक दिखला जा’चं ११ वं पर्व जिकलं. या दोन लोकप्रिय रिअॅलिटी शोनंतर ती ‘हिप हॉप इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. अशा लोकप्रिय बिहारच्या मनीषा रानीचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईत तिनं स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे. ही आनंदाची बातमी तिनं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
काही वर्षांपासून मनीषा रानी मुंबईत भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होती. बरीच मेहनत करून अखेर तिनं स्वप्नातलं शहर मानल्या जाणाऱ्या मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट लिहित मनीषा म्हणाली, “आज नवरात्रीचा पहिला दिवस. तुमच्या प्रेमानं आणि माझ्या मेहनतीनं मी मुंबईत पहिलं घर घेतलं आहे. हे सर्व काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमची ऋणी आहे.”
माहितीनुसार, मनीषा रानीचं नवीन घर गोरेगावमध्ये आहे; ज्याची किंमत ४.५ कोटींहून अधिक आहे. १७ व्या मजल्यावर मनीषा रानीचं नवं घर असून, त्याला मोठ्या बाल्कनी आहेत. तिच्या या बाल्कनीमधून निळाशार समुद्र दिसतो. गेल्या वर्षी मनीषा रानीनं आलिशान गाड्या खरेदी केल्या होत्या. तिनं एक गाडी स्वतःसाठी आणि एक गाडी वडिलांसाठी घेतली होती.
दरम्यान, मनीषा रानीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘हिप हॉप इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्यानंतर मनीषा रवी दुबे व सरगुन मेहताचं प्रॉडक्शन हाउस ‘ड्रीमियता ड्रामा’बरोबर मनीषा काम करताना पाहायला मिळणार आहे. ‘हाले दिल’ या कार्यक्रमात मनीषा झळकणार आहे. या कार्यक्रमात ती इंदूची भूमिका साकारणार आहे. ‘ड्रीमियता ड्रामा’च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मनीषा रानीचा ‘हाले दिल’ कार्यक्रम लवकरच पाहता येणार आहे.