बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व हे सध्या मोठ्या चर्चेत आहे. हे पर्व आता शेवटच्या टप्प्यात आले असले तरीही बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या मोठ्या चर्चा होताना दिसतात. सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील हे स्पर्धक सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आता जो स्पर्धक बिग बॉस( Bigg Boss OTT)च्या घरात आल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसत आहे तो म्हणजे अरमान मलिक. तो आणि त्याच्या दोन्ही पत्नी असे तिघेही सातत्याने चर्चेत असतात. आता तो पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिकाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला. पायल मलिकने नुकत्याच तिच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये अरमान आणि कृतिका जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर येतील, तेव्हा मी अरमानला घटस्फोट देईन, असे तिने म्हटले होते. याबद्दल अरमान मलिकला विचारल्यानंतर, त्याने म्हटले, “ती तिची निवड आहे. तिची मर्जी आहे. जर तिला घटस्फोट हवा असेल, तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईन. पण आम्ही जेव्हा बाहेर जाऊ, त्यानंतर या गोष्टी बघू. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. कारण- आमच्या तिघांचे नाते खूप मजबूत आहे. देव जरी खाली आला तरी तो आम्हाला वेगळे करू शकत नाही”, असे त्याने म्हटले आहे.
काय म्हणाली होती पायल?
पायल मलिक ही एक यूट्यूबर आहे. तिने तिच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये अरमानबरोबरच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. तिने म्हटले होते की, जेव्हा अरमान आणि कृतिका बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलून अरमानपासून वेगळी होईन. ते घरात आहेत, त्यांना माहीत नाही की, बाहेरच्या जगात काय चालू आहे. लोक किती वाईट प्रकारे बोलत आहेत. तिरस्कार करीत आहेत. एक घरात दोन बायका असतील, तिघांचा संसार असेल, तर ते लोकांना पटत नाही. याचा आता मला त्रास होतोय आणि पुढे तो मुलांना होईल. लोक त्यांना वाटेल ते बोलतील. मला ते सगळं नको आहे. त्यामुळे जेव्हा कृतिका आणि अरमान बाहेर येतील, तेव्हा आम्ही वेगळे राहू, असे पायलने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते.
पायल मलिकदेखील अरमान व कृतिका यांच्याबरोबर बिग बॉस ओटीटीची स्पर्धक होती; मात्र तिला बाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिने आम्ही तिघे एकत्र खूश आहोत, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, बिग बॉस ओटीटीचे तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद कोणता स्पर्धक आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.